भिवंडी: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या डोक्यात अवजड वस्तूने प्रहार करीत हत्या केल्याची घटना तालुक्यातील टेंभिवली या गावातील वीटभट्टीवर शनिवारी घडली आहे. तालुक्यातील टेंभिवली गावातील रवींद्र गोराडकर यांची वीटभट्टी आहे.
त्यांच्या वीटभट्टीवर मजूर म्हणून पती-पत्नी काम करीत होते. पती हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यात दारू पिण्याने त्यांच्यातील वाद विकोपाला गेला असता पतीने अवजड वस्तू डोक्यात मारून पत्नीची हत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच इतरांनी पतीला पकडून ठेवत घटनेची माहिती भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे यांना मिळताच ते स्वतः पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात रवाना केला. तर पतीला हत्येच्या गुन्ह्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.