Husband critically injured after boiling oil was thrown on him
डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा
कल्याण पश्चिमेकडे असलेल्या गोवंडी मोहल्ल्यात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. या मोहल्ल्यात राहणाऱ्या दाम्पत्यात वाद झाला. या वादाने परिसीमा गाठली. उकळते तेल पतीवर भिरकावल्याने तो जबर होरपळला. उकळते तेल पडल्याने हात, चेहरा, डोळ्यांसह पतीचे सर्वांग भाजून निघाले आहे. एकीकडे होरपळलेल्या इमरान अब्दुल गफार शेख (४८) याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे होरपळलेल्या इमरानने दिलेल्या जबानीवरून बाजारपेठ पोलिसांनी दिवा इमरान शेख हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शेख कुटुंब बैलबाजार भागातील मेमन मस्जिद जवळ असलेल्या गोवंडी मोहल्ल्यातील उस्मान गेजरे चाळीत राहत आहे. इमरान हे रिक्षा चालक असून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांचे कुटुंब चालते. तर पत्नी दिवा ही गृहिणी आहे. या घटनेनंतर दिवा हिला अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमरान आणि दिवा यांच्यात कौटुंबिद वाद यापूर्वी होत असत. बुधवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास इमरान आणि दिवा यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद वाढत गेला.
संतप्त झालेल्या दिवाने तेल गरम केले. गरम तेल ती अन्य काही कारणासाठी वापरणार असेल, असे आधी इमरानला वाटले. त्यामुळे तो बेसावध होता. मात्र अचानक उकळलेले तेल तिने इमरानच्या दिशेने भिरकावले. डोके, डोळे, चेहरा, हात भाजल्याने इमरानने आरडा-ओरडा केला. गलका ऐकून चाळीतील रहिवासी जागे झाले.
उकळत्या तेलामुळे इमरान भाजून निघाला. चेहरा आणि डोळ्याला गंभीर दुखापत झालेल्या इमरानने त्याच्या मित्रांच्या मदतीने पोलिस ठाणे गाठले. तेथे घडलेल्या घटनेची माहिती दिली. जबर होरपळल्यामुळे दाह सुरू झाल्याने तो अस्वस्थ झाला होता.
पोलिसांच्या सूचनेवरून इमरानने केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन आणलेला वैद्यकीय अहवाल पोलिसांना दिला. त्याप्रमाणे पोलिसांनी इमरानची पत्नी दिवा शेखच्या विरूध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम १२१ (१) प्रमाणे गुन्हा दाखल केला. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किशोर कुवर अधिक तपास करत आहेत.