

किल्ले रायगड : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा शुक्रवारी (दि. 6) दुर्गराज रायगडवर उदंड उत्साहात पार पडला. हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत झालेल्या या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याने शिवकाळाचे दर्शन घडविले. दरवर्षीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगडावर तारखेनुसार 6 जून रोजी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्यामार्फत आयोजित करण्यात येतो. यंदाही हा सोहळा नेहमीच्या दिमाखात झाला. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ माँसाहेब, शहाजीराजे यांचे स्मरण करत हा सोहळा झाला. यावेळी संभाजीराजे, शहाजीराजे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त गुरुवारपासूनच किल्ले रायगडावर विविध सांस्कृतिक शाहिरी, तसेच मैदानी खेळाच्या प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम झाले.
शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून किल्ले रायगडावर सुरू झालेल्या विविध कार्यक्रमांचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करून संभाजीराजे छत्रपती व युवराज शहाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार अनिकेत तटकरे, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे , कोकण परिक्षेत्र पोलिस आयुक्त संजय दराडे, रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणामध्ये संभाजीराजे यांनी, किल्ले रायगडावर साडेतीनशे वर्षांपूर्वी झालेला राज्याभिषेक सोहळा हा क्रांतिकारी दिवस असल्याचे सांगून शहाजीराजांची संकल्पना राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपतींच्या माध्यमातून पूर्णत्वास नेली असल्याने या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आज देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले असले, तरी त्याप्रमाणे जगता येत नसल्याची खंत व्यक्त केली. अठरापगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य उल्लेखनीय होते, असे त्यांनी सांगितले.
दुर्गराज रायगड हे राजकीय विचारपीठ नसल्याचे नमूद करून, रायगडचे संवर्धन करावयाचे असेल, तर गडावर माझ्यासह सर्व मान्यवरांनी चालत पायरी मार्गाने यावे. रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून केलेल्या संवर्धन कामाची माहिती त्यामुळे आपल्याला मिळेल, असे त्यांनी सांगितले. गडावरील मोठ्या तलावाच्या दुरुस्तीचे काम शास्त्रोक्त पद्धतीने केले जात असून, नाणे दरवाजाचे कामही, यासंदर्भातील ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे केल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. मी स्वतः पाठपुरावा केला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना केली. त्या प्राधिकरणामार्फत होणारी कामे योग्य पद्धतीने होत असल्याचे सांगत, माझ्यावर टीका करणार्यांनी एकदा तरी माझ्यासमवेत चालत यावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले.
किल्ले रायगडसह राज्यातील प्रमुख पंचवीस किल्ले फोर्ट फेडरेशनच्या ताब्यात देऊन त्याची एक शिवभक्त वारसदार म्हणून पुढील पिढीला या किल्ल्यांचे असलेले महत्त्व आपण दाखवून देऊ. याकामी शासनाकडून आपल्याला कोणत्याही पैशाची अपेक्षा नाही. शिवभक्तांच्या माध्यमातून यासाठी लागणारा निधी आपण उभा करू. 25 किल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन करत संपूर्ण जगाला हेवा वाटेल असे काम आम्ही करू असे सांगत, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जगभर पोहोचले असून, हा राज्याभिषेक आता लोकोत्सव झाला असून, तरुणांची संख्या लक्षणीय आहे. ही ताकद वाढत जाणार आहे, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.