Dombivli Mhatre Sports Complex Tree Slaughter pudhari
ठाणे

Dombivli Tree Cutting | डोंबिवलीतील म्हात्रे क्रीडा संकुलात शेकडो झाडांची कत्तल; पर्यावरणवाद्यांसह क्रीडा प्रेमींमध्ये संताप

शेकडो झाडांची कत्तल करणाऱ्यांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करावी.

पुढारी वृत्तसेवा

Dombivli Mhatre Sports Complex Tree Slaughter

डोंबिवली :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली एमआयडीसी परिसरातील वै. हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात भयंकर कांड बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. विकास कामांच्या नावाखाली रात्री/बेरात्रीच्या सुमारास या संकुलातील शेकडो लहान/मोठी झाडे तोडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे पर्यावरणवाद्यांसह क्रीडा प्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सद्य:स्थितीत या क्रीडा संकुलाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक क्रीडा संकुल म्हणून विकसित करण्याचे केडीएमसीने ठरवले आहे. त्यासाठी राज्य शासन आणि लोकप्रतिनिधींकडून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विकास कामे सुरू झाल्यानंतर संकुलाच्या सभोवताली पत्रे ठोकून परिसर सील करण्यात आला आहे. याच आडोशाला ठेकेदाराकडून (केडीएमसीच्या संमतीने ?) मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडी सुरू असल्याचा प्रकार क्रीडा संकुलात बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारायला आलेल्या जागरूक नागरिकांना आढळून आला. अनेक लहान/मोठी झाडे तोडून त्याची तातडीने विल्हेवाट लावण्यात येत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. कुणालाही आत प्रवेश दिला जात नसल्याने हा प्रकार गुप्तपणे सुरू असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांसह क्रीडा प्रेमींकडून करण्यात येत आहे.

परवानगीच्या नियमांचे उल्लंघन ?

एकीकडे केडीएमसी प्रशासनाकडून दरवर्षी वृक्ष लागवडीसाठी लाखो रूपये खर्च करत असल्याचे आणि वर्षभरात दीड लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट असल्याचे जाहीर केले जात आहे. मात्र दुसरीकडे आपल्याच मालकीच्या जागेतील परिपक्व झाडे विकासाच्या नावाखाली तोडली जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. केडीएमसीच्या वृक्ष संवर्धन समितीची यात काय भूमिका आहे ? परवानगीच्या नियमांचे पालन तरी झाले आहे का ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
  

त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी

या प्रकारामुळे पर्यावरण प्रेमींसह खेळाडूंनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विकासाच्या नावाखाली होणारी ही वृक्षतोड अत्यंत निंदनीय असल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. क्रीडा संकुलातील शेकडो झाडांची कत्तल करणाऱ्यांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करावी. जर ही तोड बेकायदेशीर असेल तर संबंधितांच्या विरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पर्यावरण प्रेमींसह खेळाडूंनी केली आहे.

खासगी कार्यक्रमांमुळे संकुलाची पुरेवाट

क्रीडाप्रेमींनी समाज माध्यमांवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. हे क्रीडा संकुल केवळ खेळाडूंसाठी आणि विविध खेळांसाठीच राखीव ठेवावे. एकीकडे भविष्यात या संकुलावर दहीहंडी, नवरात्रौत्सव, लग्न समारंभ यांसारख्या कार्यक्रमांसाठी दिले जाणार असेल तर या विकासाला अर्थ राहणार नसल्याचे क्रीडा शौकिनांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे पर्यावरण यांचा समतोल राखून विकास कामे करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या बेकायदा वृक्षतोडीमुळे डोंबिवलीतील हिरवळ कमी होण्याची भिती निवासी विभागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना व्यक्त केली.

रात्रीस खेळ चाले...

एकीकडे प्रसिद्धीखातर लाखो झाडे लावण्याचा ढोल पिटायचा आणि दुसरीकडे स्वतःच्या मालकीच्या क्रीडा संकुलातील शेकडो परिपक्व झाडांची रात्री/बेरात्री पत्रे लावून गुपचूप खांडोळी करायची. हा दुटप्पीपणा जागरूक नेटकऱ्यांनी उघडकीस आणला आहे. विकासाच्या नावाखाली डोंबिवलीचा श्वास कोंडण्याचा हा कट आहे. या बेकायदेशीर वृक्षतोडीला जबाबदार असलेल्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करा. जबाबदारांची नावे जाहीर करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा. अन्यथा विकास या शब्दाआड आम्हाला आमच्या मुलांसाठी ऑक्सिजन विकत घ्यायची वेळ आणू नका, असे आवाहन पर्यावरणवाद्यांसह क्रीडा प्रेमींकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT