आपला दवाखाना ओस पडला; परिचारिकांचा पगार रखडला pudhari photo
ठाणे

Nurse payment issues : आपला दवाखाना ओस पडला; परिचारिकांचा पगार रखडला

बंद दवाखान्याच्या जागी इतर व्यवसाय सुरू, दंड वसूल करून कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार द्यावेत!

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे शहरात 40 ठिकाणी सुरू करण्यात आलेला आपला दवाखाना उपक्रम बंद पडला असून कंत्राटदार कंपनीने येथे काम करणाऱ्या परिचारिकांचे पगार थकवल्याने त्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे न्यायाची मागणी केली. हे दवाखाने बंद पडल्याने त्याचा ताबा इतर व्यवसायांनी घेतल्याची देखील चर्चा आहे.

शहरात 40 ठिकाणी सुरू असलेल्या या दवाखान्यांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि परिचारिका बेरोजगार झाले असून त्यांचा सहा सहा महिन्यांचा पगार देखील थकला आहे. हा पगार मिळवून देण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांच्याकडे निवेदन देऊन केली.

याबाबत बोलताना केळकर यांनी सांगितले की आपला दवाखाना हा उपक्रम राबवण्यासाठी ठाणे महापालिकेने बंगळुरु येथील मेडको नावाच्या कंपनीला कंत्राट दिले होते. ऑक्टोबरपर्यंत या कंपनीकडे कंत्राट होते, मात्र ऑगस्टमध्येच हे दवाखाने बंद पडले.

तत्पूर्वी मागील सहा सहा महिन्यांचा पगार देखील कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील कोरडी गेली. या कंपनीला 56 लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी ही कंपनी महापालिकेला दाद देत नाही.

त्यामुळे महापालिकेने कंपनीकडून सर्व दंड वसूल करून कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार द्यावेत आणि संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी श्री. केळकर यांनी केली. ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अन्यथा या कर्मचाऱ्यांचा महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही केळकर यांनी दिला.

जनसेवकाचा जनसंवाद

खोपट येथील भाजपच्या कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात शुक्रवारी विविध समस्या घेऊन अनेक नागरिकांनी आमदार संजय केळकर यांना निवेदन दिले. बिल्डरांकडून रहिवाशांची झालेली फसवणूक, वारसा हक्क प्रकरणे, पाणी टंचाई, महापालिकेबाबत तक्रारी, आरोग्य, शिक्षण अशा विषयांचा यात समावेश होता. यावेळी माजी उप महापौर अशोक भोईर, माजी नगरसेवक भरत चव्हाण, राजेश गाडे आदी उपस्थित होते.

महापालिका म्हणजे प्रयोगशाळा नाही!

एखादा उपक्रम सुरू करायचा, तो बंद पडला की दुसरा उपक्रम सुरू करायचा. महापालिका म्हणजे प्रयोगशाळा नाही. लोकांना थातुर मातुर सेवा देणारी यंत्रणा नको, सक्षम आरोग्यसेवा देणारी यंत्रणा महापालिकेने उभी करायला हवी, असे मतही केळकर यांनी मांडले. बंद पडलेल्या दवाखान्यांच्या जागी आता अनेक ठिकाणी इतर व्यवसाय सुरू झाल्याचे दिसत असून एके ठिकाणी तर साड्यांचे दुकान सुरू झाले आहे. त्यामुळे या जागा देखील गिळंकृत होण्याची भीती व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT