शहापूर : राज्य शासनाच्या सांस्कृतिक धोरणांतर्गत वृद्ध साहित्यिक व कलावंतांना दिले जाणारे मानधन अनेक महिन्यांपासून रखडल्याने संबंधित घटकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. साहित्य, नाट्य, लोककला, संगीत, चित्रकला अशा विविध क्षेत्रांत आयुष्यभर योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना त्यांच्या उतारवयात आधार देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येते.
मात्र प्रत्यक्षात मानधन वेळेवर न मिळाल्याने या योजनेचा मूळ हेतूच धूसर होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. राज्यातील अनेक वृद्ध साहित्यिक व कलावंतांचे उत्पन्नाचे साधन मर्यादित आहे. वाढती महागाई, औषधोपचारांचा खर्च, घरभाडे आणि दैनंदिन गरजा भागवतांना हे मानधन अत्यंत महत्त्वाचे ठरते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून बँक खात्यात मानधन जमा न झाल्याने अनेकांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. तर काहींची औषधोपचारही खोळंबल्याचे वास्तव समोर येत आहे.
या योजनेअंतर्गत हभप सुरेश परटोळे, हभप विजया बेलवले, हभप वनिता सातपुते, हभप वंदना हरड, हभप कमला वेखंडे, हभप पंढरीनाथ मंडलिक, हभप रामचंद्र भागरे, हभप एकनाथ पांढरे, हभप गणपत वेखंडे, हभप तारा मांजे, हभप मीराबाई जागरे, हभप मंदा मांजे, हभप अनिता बेलवले आदी पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेवर सादर करूनही मंजूरी मिळण्यास व निधी वितरणात विलंब होत असल्याचे सांगितले जाते.
संबंधित विभागाकडून कधी निधीअभावी तर कधी प्रशासकीय कारणे पुढे केली जात असून, प्रत्यक्षात ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही स्पष्ट उत्तर न मिळाल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
सांस्कृतिक क्षेत्रातील संघटना व साहित्यिक मंडळांनी याबाबत आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. ज्या लोकांनी राज्याच्या संस्कृतीचा वारसा जपला, लोककलेला ओळख मिळवून दिली, त्यांनाच आज शासनाच्या दारात हेलपाटे मारावे लागत आहेत. ही दुर्दैवी बाब असल्याची खंत अनेक ज्येष्ठ कलावंतांनी दैनिक पुढारीशी बोलतांना व्यक्त केली. तसेच काही संघटनांनी शासनाकडे निवेदन देत तातडीने रखडलेले मानधन अदा करण्याची मागणी केली आहे.
वृद्ध साहित्यिक व कलावंत हे समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी असलेली योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवली जावी.शासनाने लवकरात लवकर निधी मंजूर करून सर्व प्रलंबित मानधन वितरित करावे, तसेच भविष्यात नियमित व कालबद्ध पद्धतीने मानधन देण्याची हमी द्यावी.बी.डी.मांजे, सामाजिक कार्यकर्ते