शुभम साळुंके
ठाणे : उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. धारदार शस्त्रांनी झालेल्या दुहेरी हत्याकांडापाठोपाठ आता उसाटने परिसरात एका उच्चशिक्षित तरुणाला चारचाकी वाहनाने धडक देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वाहनांचा ताफा घेऊन त्याच्या घरापर्यंत जात दहशत निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करून आपले कार्य पार पूर्ण केले आहेत. मात्र संबंधित गुंडांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची पडताळणी करून वेळीच रक्तरंजित राडे होण्यापेक्षा तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करून धन्यता दाखविण्यात पोलिसांना कधी यश येणार ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
सुमारे दोन महिन्यांपूर्वी हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कैलास कॉलनी परिसरात दोन सख्ख्या भावांची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे तपासात समोर आले होते. या घटनेनंतर मृत तरुणांच्या कुटुंबीयांनी पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप केले होते. तर नुकताच शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीती पाले गावात एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला होता. या घटनेत तरुणाला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणात देखील पोलीस यंत्रणांवर ग्रामस्थांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. या घटनांची चर्चा शांत होत नाही तोच उसाटने येथील ताज्या घटनेने परिसरातील कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
उसाटने येथील घटनेत काही तरुणांनी हातात दांडकी तसेच धारदार शस्त्रे घेऊन दहशत निर्माण केल्याचा आरोप आहे. संबंधितांनी चारचाकी वाहनातून येत एका तरुणाच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केल्याचे आणि त्यानंतर त्याच्या घरापर्यंत वाहनांचा ताफा नेल्याचे व्हिडीओतून दिसून येत आहे. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या आरोपींवर तत्काळ प्रतिबंधात्मक कारवाई झाली का, तसेच त्यांच्यावर तडीपारीसारखी कारवाई प्रस्तावित आहे का ? , याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत.
गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेल्या समाजकंटकांवर वेळीच कठोर प्रतिबंधात्मक कारवाई झाली नाही, तर कायद्याचा धाक कमी होण्याची शक्यता असते. एखाद्या गुन्ह्यानंतर कारवाई करण्यापेक्षा संभाव्य गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी सक्रिय भूमिका घेणे अपेक्षित आहे. अन्यथा ‘फिर्यादींना आव्हान देण्याची’ आणि कायद्याला न जुमानण्याची मानसिकता गुन्हेगारांमध्ये बळावू शकते. उसाटने येथील व्हायरल झालेल्या व्हिडिओत आरोपींनी फिर्यादींना गंभीर इशारे दिलेले आहेत. तर याबाबतच्या तक्रारी राज्याच्या गृह मंत्र्यांपासून ते स्थानिक पोलीस यंत्रणांपर्यंत झालेल्या आहेत.
उल्हासनगर परिमंडळ-४ मध्ये वाढत्या गुन्हेगारीबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असताना, पोलिसांनी केवळ गुन्हे दाखल करण्यापुरती कारवाई न करता गुन्हेगारांच्या हालचालींवर अंकुश ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक करण्याची गरज आहे. कायदा सर्वांसाठी समान असून, गुन्हेगार कितीही प्रभावशाली असला तरी त्याच्यावर कायद्याचा बडगा उगारला जाईल, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करणे हीच पोलिसांची खरी कसोटी ठरणार आहे. त्यामुळे फोफावलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस काय प्रयत्न करतात ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. संबंधित प्रकरणात पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले आहे.