नेवाळी: नेवाळी परिसरातील एका चाळीत सुरू असलेल्या गांजा विक्रीच्या अड्ड्यावर हिललाईन पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ४ किलो २६१ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे २.२७ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी जितेंद्र पावशे त्याचा साथीदार इमरान सय्यद यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडूज मिळालेल्या माहितीनुसार नेवाळी नाका येथील संजय बिर्यानी वाल्या जवळील ओमसाई चाळ परिसरात छापा टाकला होता. त्यावेळी आरोपींकडे विक्रीसाठी ठेवलेला गांजा आढळून आला आहे.
पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त करून दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, मुख्य आरोपी जितेंद्र पावशे याच्याविरुद्ध यापूर्वीही हिललाईन पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. वारंवार गुन्हे करूनही अशा सराईत आरोपींच्या हालचाली सुरूच असल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांच्या बेकायदेशीर कारवायांना कायमचा आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. नेवाळी हा परिसर उल्हासनगर, कल्याण पूर्व, पलावा आजूबाजूच्या शहरांना जोडणारा आहे. त्यामुळे या परिसरातील नशेडी गांजा खरेदीसाठी नेवाळीत येत असल्याची माहिती समोर आली आहे.