Murbad truck accident Pudhari
ठाणे

Murbad truck accident: महामार्गालगतच्या उघड्या नाल्यात ट्रक कोसळला

मुरबाड नगरपंचायतीच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक नमुना

पुढारी वृत्तसेवा

मुरबाड शहर: मुरबाड शहरातील म्हसा नाका परिसरात शुक्रवारी दुपारनंतर एक भीषण अपघात घडला. एमएच 12 वायक्यू 2472 क्रमांकाची पुणे येथील अवजड मालवाहतूक करणारी गाडी राष्ट्रीय महामार्ग 548 अ लगत वर्षानुवर्षे उघड्या अवस्थेत ठेवण्यात आलेल्या नाल्यात थेट कोसळून पलटी झाली.

या घटनेमुळे काही काळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले होते.

घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मुरबाड नगरपंचायतीच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शहरातील हा उघडा नाला म्हणजे विकासकामांच्या नावाखाली चाललेल्या निष्काळजी आणि बेफिकीर प्रशासनाचा जिवंत पुरावा असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अनेक वर्षांपासून हा नाला उघडाच ठेवण्यात आला असून नागरिकांनी वारंवार लेखी व तोंडी सूचना देत भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

पूर्वी हा नाला लहान स्वरूपाचा होता. मात्र नंतर जेसीबीच्या सहाय्याने त्याची काँक्रीटची संरक्षण किनार तोडून रुंद करून धोकादायक अवस्थेत सोडण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगत आहेत. विशेष म्हणजे या नाल्यावर कोणतेही मजबूत संरक्षण कठडे, चेतावणी फलक किंवा सुरक्षेची उपाययोजना करण्यात आलेली नाही. परिणामी हा नाला आता नागरिक आणि वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळाच बनल्याचे बोलले जात आहे.

सदर अपघाताच्या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येते, अशी टीका नागरिक करत आहेत. आता या घटनेनंतर तात्पुरती मलमपट्टी करून कोट्यवधी रुपयांची बिले काढली जातील, मात्र मूळ जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शहरातील विकासकामांच्या नावाखाली झालेल्या निकृष्ट नियोजनाचा आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा हा परिणाम असल्याचे सांगत संबंधित अधिकारी, अभियंते, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, निष्काळजीपणा आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. तर आज ट्रक पलटी झाला; उद्या एखाद्या नागरिकाचा जीव गेला तर जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT