मुरबाड शहर : मुरबाड तालुक्यातील विविध ठिकाणी वीटभट्टी मालकांकडून आदिवासी मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या स्थलांतरित कुटुंबांच्या आरोग्याचा तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शासनाने याची तातडीने दखल घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुरबाड तालुक्यात सुरू असलेल्या वीटभट्टी व्यवसायातील समस्या, गैरप्रकारांबाबत आरपीआय सेक्युलर पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन आरपीआय सेक्युलर पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रविंद्र चंदने यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड तालुका युवाध्यक्ष राजेश गायकवाड यांनी आज तहसील कार्यालयात सादर केले.
तसेच अनेक वीटभट्ट्यांवर वीज चोरीचा प्रश्न, मातीचे अवैध उत्खननाचा प्रश्न असल्याचेही निवेदनात नमूद आहे. या प्रकारांमुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मुरबाड तालुक्यातील सर्व वीटभट्ट्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच स्थलांतरित आदिवासी मजुरांच्या आरोग्य व शिक्षणासाठी तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.