Hartalika Ganesh Chaturthi pudhari photo
ठाणे

Ganesh Chaturthi 2026: गणेशमूर्ती स्थापना कधी करावी? वेळ जाणून घ्या; पंचांगकर्ते दा.कृ. सोमणांची माहिती

यापूर्वी सन २०००, २००६ आणि २००९ मध्ये हरतालिका आणि श्री गणेश चतुर्थी एकाच दिवशी आले होते.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: सोमवार १४ सप्टेंबरला श्रीगणपती बाप्पांचे आगमन होत आहे. सोमवारी १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी भाद्रपद शुक्ल तृतीया संपते आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी सुरू होते. सूर्योदयी भाद्रपद शुक्ल तृतीया असल्याने हरतालिका पूजन त्या दिवशी करावयाचे आहे आणि मध्यान्हकाली भाद्रपद शुक्ल चतुर्थी असल्यामुळे श्रीगणेशमूर्ती स्थापना आणि पूजन त्याच दिवशी करावयाचे आहे. त्यामुळे यावर्षी हरतालिका आणि श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी आले आहेत.

यापूर्वी सन २०००, २००६ आणि २००९ मध्ये हरतालिका आणि श्री गणेश चतुर्थी एकाच दिवशी आले होते. यानंतर सन २०३२ मध्येही असाच योग येणार असल्याची माहिती पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले,

हरितालिका आणि श्रीगणेश चतुर्थी ही दोन्ही व्रते भिन्न असल्याने कोणतीही पूजा अगोदर किंवा नंतर केली तरी चालेल. सोमवारी सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी भाद्रपद शुक्ल तृतीया संपत असली तरी त्या दिवशी हस्तालिका पूजा सूर्योदयापासून मध्यान्हकालापर्यंत म्हणजे दुपारी १-४८ पर्यंत केली तरी चालेल.

हरितालिकेचा उपवास मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी सोडावयाचा आहे. ऋषिपंचमीचा उपवास करीत असेल तर अन्नाचा वास घेऊन उपवास सोडता येतो आणि ऋषिपंचमीचा उपवास चालू ठेवता येऊ शकेल.

सोमवार १४ सप्टेंबर रोजी मध्यान्हकाली भाद्रपद शुक्ल चतुर्थी असल्याने त्याच दिवशी श्रीगणेश चतुर्थी आहे. श्रीगणेशमूर्ती स्थापना आणि श्रीगणेश पूजन सकाळी ११-२१ ते दुपारी १-४८ या मध्यान्हकाळी करावयाचे आहे. जर ही वेळ शक्य नसेल तर पहाटे उषःकालापासून दुपारी मध्यान्हकाल संपेपर्यंत म्हणजे दुपारी १-४८ पर्यंत श्रीगणेशमूर्ती स्थापना आणि गणेश षोडशोपचार पूजन करावयाचे असल्याचे सोमण यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT