Harishchandragad  Pudhari
ठाणे

Harishchandragad Missing Youths: हरिश्चंद्रगडाच्या खोल दरीत दोन तरुणांचे अवशेष; बेपत्ता सिन्नरच्या तरुणाचा शोध सुरू

८०० फूट खोल दरीत रेस्क्यू टीमची मोहीम; पुण्याच्या गणेश सोनार आणि गुजरातच्या विश्वराजसिंह गोईल यांची ओळख पटली

पुढारी वृत्तसेवा

दिनेश कांबळे

डोळखांब: गड-किल्ले म्हणून पर्यटन स्थळ असलेल्या हरिश्चंद्र गडावरील कोकण कड्याच्या सुमारे ८०० फुट खोल दरीत तरुणांच्या मृतदेहाचे अवशेष आढळून आले असून या दोनही तरुणांच्या मृतदेहाची ओळख राजूर आणि टोकावडे पोलिसांना पटलेली आहे. दरम्यान लोणावळा अँडवेनचर ट्रेकर्सच्या गणेश गिते यांच्या रेस्क्यू टीमने ही मोहीम फत्ते केली.

मात्र शोधायला गेले एक मृतदेह अन सापडले पुण्याच्या गणेश सोनारचा सांगाडा तर गुजरातच्या विश्वराजसिह गोईलचा मृतदेह, पण मात्र सिन्नर येथील कुमार ज्ञानेश्वर भागवत वय २१ हा तरुण हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी मोटरसायकल लाऊन दि.५ ऑक्टोबरपासून बेपत्ता असल्याने अजूनही हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात बेपत्ता तरुण-तरुणींचे सांगाडे सापडण्याची शक्यता आहे.

गुजरात येथील भावनगर येथे वास्तव्यास असलेला विश्वराजसिह मयुरसिंह गोईल वय २३ त्याचे आठ महिन्यापुर्वी लग्न झाले होते. तर पती-पत्नीत वारवारं वाद होत असल्यामूळे तीला घरच्यांनी घेऊन गेले होते. आणि विश्वराजसिह गोईल विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर विश्वराजसिह याने घरी सागितले कि, मी फिरुन येतो, मात्र तो परत घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी पालीताना पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल केली होती.

परंतु सोमवारी दि.१२ ऑक्टोबर रोजी हरिश्चंद्र गडावरील कोंकणकड्यावरुन मी आत्महत्या करीत असल्याचा व्हिडीओ घरच्यांना टाकला होता. तसेच कोकणकड्यावर एका बँगेत कपडे, चावी व मोबाईल आणि हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याशी मोटरसायकल आढळून आली होती. या अनुषंगाने गोईल कुटुंबियांनी राजूर पोलिस स्टेशनचे स.पो.नि.किशोर पवार, पो.काँ. लक्ष्मण मुठे व अभयारण्यातील वन कर्मचाऱ्यांसमवेत बुधवार दि.१४ रोजी हरिश्चंद्रगड, कोकणकडा परिसरात विश्वराजसिह गोईलचा शोध घेतला असता कोकणकड्याच्या खाली ८०० फुट खोलवर दरीत एक प्रेत दिसुन आले.

दरम्यान शुक्रवारी टोकावडे पोलिस स्टेशनचे स.पो.नि.शितलकुमार नाईक, पो.हवालदार पाडुरंग बगाड, पो.काँ.वासुदेव सुरोसे आणि गणेश गिते यांच्या रेस्क्यू टीमला बोलवण्यात आले. तर कोकण कड्यातील ८०० फुट दरीत दोरीच्या सहाय्याने उतरून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. यावेळी या टीमला एक जीर्ण झालेला सांगाडा आढळून आला.

या सांगाड्याची जवळून पाहणी करत असताना टीमच्या सदस्यांना मोबाईल आढळून आला. त्यामुळे आपण शोध एकाचा घ्यायला आलो अन सापडला दुसरा अशी परिस्थिती यावेळी निर्माण झाली होती.ही सर्व हकीकत वरती असलेल्या पोलिसांना रेस्क्यू टीमने कळवली. मात्र रेस्क्यू टीमने आजूबाजूला शोधमोहीम सुरूच ठेवली.

यावेळी आधीच्या सांगाड्यापासून काही अंतरावर पुन्हा एक सांगाडा मिळून आला. हा सांगाडा विश्वराजसिह गोईल याचा असल्याची खात्री रेस्क्यू टिमने केली. यावेळी दोन्ही मृतदेह रेस्क्यू टिमने वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये बांधून कोकणकड्या वरती आणली.

तसेच टोकवडे येथील स.पो.नि.शितलकुमार नाईक यांनी दुसऱ्या सांगाड्याची ओळख सांगाड्याजवळीक सापडलेल्या मोबाईल वरुन शोध घेतला असता गणेश जितेंद्र सोनार वय २६ रा. म्हाळुंगे, जि.पुणे हा जुलै महिन्यात बेपत्ता असल्याची पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. या अनुषंगाने सागाड्याचे शवविच्छेदन करण्यात आले.

हरिश्चंद्र गडावर कोकणकट्यावरील ८०० फुट खोल दरीत सहा महिण्यापुर्वी बेपत्ता पर्यटकाचा शोध घेताना सिल्वासाचा रोहित सोळुंके आणि लांतुरचा गणेश होनराव या दोघा तरुणाचे सांगाडे आणि सांगाड्यातील फुट-दोन फुटाच्या अंतराव हाडे तसेच मोबाईल कव्हर, रुमाल, वॉल्लेट. आधारकार्ड, पॅनकार्ड आढळून आले.

तसेच आता पुण्याच्या गणेश सोनारचा सांगाडा तर गुजरातच्या विश्वराजसिह गोईलचा मृतदेह आढळून आल्याने वर्षाभरात चार ते पाच जणांनी हरिश्चंद्र गडावरील कोकणकड्यावरुन आत्महत्या केल्याच्या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT