डोंबिवली: मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कल्याण-डोंबिवली परिसरातील तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडला आहे. यंदाच्या मोसमातील हे उच्चांकी तापमान ठरले आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी व्यक्त केली आहे.
मंगळवारी नोंदविण्यात आलेल्या तापमानानुसार कल्याणमध्ये ४०.५ अंश सेल्सिअस तर डोंबिवलीत ४०.४ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास सूर्य अक्षरशः आग ओकतोय की काय ? असे वाटत होते. याशिवाय ठाणे, कोपरखैराणे, तळोजा, पनवेल, पालघर, विरार, बदलापूर, आदी परिसरातही तापमानाने ३९ ते ४० अंशांचा टप्पा पार केला आहे. काही ठिकाणी तर तापमान ४१ अंशांहून अधिक नोंदवले गेले असून, विक्रमगड येथे तब्बल ४२ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेल्याची माहिती हवामान अभ्यासकांकडून देण्यात आली.
मार्चच्या सुरूवातीलाच आणि होळीच्या दुसऱ्याच दिवशी उष्णतेचा पारा एवढ्या वेगाने वाढल्याने येत्या काही दिवसांत उकाड्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, हलके सुती कपडे परिधान करणे आणि उष्णतेपासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अँटीसायक्लोनच्या प्रभावामुळे ईशान्येकडून कोरडे वारे (land breeze) वाहत आहेत. हे वारे जमिनीवरून वाहत असल्यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे. त्यातच समुद्री वारा उशिरा सुरू होत असल्याने उष्णतेची तीव्रता वाढून उष्णतेची लाट (heatwave) सदृश परिस्थिती निर्माण होत असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली. दरम्यान, अचानक वाढलेल्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.