haircut Pudhari
ठाणे

Badlapur haircut price hike : बदलापुरात केस कापणे दाढी करणे महागले

पाच वर्षानंतर दरवाढ; सर्वसामान्य नागरिकांना बसणार फटका

पुढारी वृत्तसेवा

बदलापूर : कुळगांव-बदलापूर शहरातील सलून मध्ये जर तुम्ही दाढी आणि केस कापत असाल तर आता तुम्हाला जादा पैसे द्यावे लागणार आहेत. केस कापण्यासाठी 120 रुपये तर दाढी करण्यासाठी आता 60 रुपये द्यावे लागणार आहेत. वीर भाई कोतवाल नाभिक समाज, कुळगांव बदलापूर सलून असोसिएशन यांनी याबाबत एक बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे. वाढती महागाई, वस्तूंचे वाढलेले दर यासह गेल्या पाच वर्षांपूर्वी म्हणजेच जानेवारी 2020 मध्ये केस आणि दाढी कापण्याच्या भावात वाढ झाली होती. तेव्हा कोरोना सारखी महामारी असताना झालेली दरवाढीनंतर पाच वर्षांनी ही दरवाढ करण्यात आल्याचं असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आलं आहे. वाढलेल्या महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.

कुळगांव-बदलापूर नगरपालिका क्षेत्रात तीनशेहुन अधिक सलून असून असोसिएशनच्या सर्व सदस्यांना ही दरवाढ लागू केली आहे. बदलापूरची वाढती लोकसंख्या आणि सलूनची संख्या ही वाढत आहे. तसेच नवे ब्रँड आणि विविध युनिसेस्क आणि नामांकित कंपन्यांचे सलूनही बदलापुरात आले आहेत. त्यांचा दर हा बदलापुरातील सर्वसामान्य सलूनच्या तुलनेत कमी आहे. मात्र गेल्या पाच वर्षात झालेली महागाई आणि सर्वच वस्तूंचे वाढलेले भाव यासह दाढी आणि केस कापण्यासाठी लागणारे साहित्य तसेच फेस वॉश, मसाज क्रीम, ब्लेड या सर्वांचेच दर वाढले असून त्या अनुसरूनच या दरवाढीचा निर्णय घेतल्याचे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आलेे.

शहरात यापूर्वी केस कापण्यासाठी 100 रुपये तर दाढी करण्यासाठी 50 रुपये आकारण्यात येत होते. मात्र आता केस कापण्यासाठी 120 रुपये, तर दाढी करण्यासाठी 60 रुपये मोजावे लागणार आहेत. जानेवारीच्या सुरुवातीलाच या भाव वाढीला मंजुरी देण्यात असली तरी गेल्या महिन्याभरात याबाबत ग्राहक आणि केस कापायला येणाऱ्या नागरिकांमध्ये जागृत व्हावी म्हणून अनेक सलून चालक ही दरवाढ लागू करत नव्हते. मात्र आता 31 जानेवारीपासून या निर्णयाची पूर्णपणे अंमलबजावणी होणार असल्याने बदलापुरात केस आणि दाढी कापण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT