ठाणे : खडवली आणि टिटवाळा रेल्वे स्थानकादरम्यान गुरवली रेल्वे स्थानक उभारण्यासाठी बर्याचदा मागण्या रेल्वे प्रशासनाकडे उपस्थित करण्यात आल्या आहेत. परंतु रेल्वे प्रशासनातर्फे गुरवली रेल्वे स्थानक उभारण्याची कल्पना फक्त रेल्वे प्रवासी संघटनेची आहे. त्याव्यतिरिक्त मध्य उपनगरीय रेल्वे प्रशासनाची या परिस्थिती संबंधित कोणतेही निर्णय घेतल्याचे व विषयासंबंधित प्रतिक्रिया करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिलेले नाही, असे मुख्य जनसंपर्क अधिकार्यांद्वारे सांगण्यात आले आहे.
तब्बल 1966 साली माजी खासदार सोनुभाऊ बसवंत यांनी 35 गावच्या सहमतीने गुरवली स्थानक उभारणीसाठी याचिका संसदेत दाखल केली होती. मांडा, टिटवाळा, काळू पाडा, गुरवली, राया, निंबवली, वझुरली, जुगाव, चिराडपाडा, पिसा, वसुंदी, कोंढेरी, मोस, झोर, आणा, वावेघर, उतणे, आंबिवली, फाळेगाव, मढ, रुंदा, बैलपाडा, भोंगळ पाडा, दानबाव, चिंचवली, नडगाव, उशीद, हाल, आंबर्जे, आमना, सांगोडा, सावाद, किरवली, इताडे, मुठवाल इत्यादी गावाच्या पदाधिकारी आणि ग्रामस्थांसह मागणी मध्य उपनगरीय रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 2001 साली, माजी खासदार रामभाऊ कापसे आणि रामभाऊ मालगे यांनी रेल्वे मंत्र्यांना गुरवली स्थानक उभारणी विषयी नव्याने मागणी केली होती.
रेल्वे स्थानक झाल्यास प्रवाशांचा फायदा
खडवली पर्यटन आणि टिटवाळा धार्मिक स्थान असून 400 ते 500 प्रवासी हंगामी काळात प्रवास करत असतात. तसेच काही वर्षांपासून ह्या भागात विकासासोबत लोकवस्ती देखील भरपूर प्रमाणात वाढत आहे. तसेच वाढत्या लोकसंख्ये सोबत नोकरदारांचे आणि कामानिमित्त प्रवास करणार्यांचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढू लागले आहे. त्यामुळे हे स्थानक झाल्यास प्रवाशांचा फायदा होईल.