Going out for vacation...so be careful! Take care of your home and valuables.
डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा
एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात शाळा आणि महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा संपत आलेल्या असतात. त्यानंतर उन्हाळी सुट्टी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही आपल्या गावी किंवा बाहेरगावी जाण्याचे वेध लागतात. बाहेरगावी जाण्यापूर्वी आपल्या घराची आणि घरातील किमती वस्तूंची काळजी घेण्याकडे मात्र कमालीचे दुर्लक्ष होते. हीच संधी साधून चोरटे बंद घरे साफ करतात. म्हणूनच स्वतःच्या मूळगावी किंवा बाहेरगावी जाताना सावधानता बाळगावी. आपल्या घरासह मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केले आहे.
कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण परिसरात चोऱ्या, घरफोड्या आणि वाटमाऱ्यांच्या घटना पाचवीलाच पुजल्यासारख्या घडत असतात. घरासह प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवणे कोणत्याही पोलीसांना शक्य नाही. मात्र प्रत्येक सर्वसामान्य रहिवाशाने थोडीशी जरी काळजी घेऊन सावधानता बाळगली तर अनेक गुन्ह्यांना आळा घालता येणे शक्य आहे. या दृष्टीकोनातून पोलिस प्रशासन जनतेमध्ये जाऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतात.
आपल्या मालमत्तेचे आपणच कसे रक्षण करावे, याचे धडे स्थानिक पोलिस सोसायट्यांमध्ये बैठका घेऊन देत आहेत. आपल्या घराला सेफ्टी डोअर बसवावेत, शक्य असल्यास आपल्या इमारतीच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमावेत किंवा इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, आदी सूचना पोलिसांकडून केल्या जात आहेत.
रात्रीच्या सुमारास पोलिसांकडून गस्ती सुरू असतात. उन्हाळ्याच्या दिवसात शाळा आणि महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी सुट्टी मिळते. त्यामुळे अनेक जण राहते घर बंद करून कुटुंब कबिल्यासह आपल्या गावी किंवा बाहेरगावी जात असतात. अनेकवेळा एकाच इमारतीतील बहुतांश कुटुंबे घर बंद करून बाहेरगावी जातात. मात्र बाहेरगावी जाण्यापूर्वी कुणाही रहिवाशांकडून आपल्या घराची काळजी घेण्यासाठी सावधानता बाळगली जात नाही. अनेकदा आपल्या शेजारी-पाजारी अथवा सोसायटीला देखील याची कल्पना दिली जात नाही.
हीच चोरट्यांसाठी नामी संधी असते. चोरटे अशा बंद घरांची आधी रेकी करतात. त्यानंतर चोरी करण्यासाठी घराची निवड करतात, असे पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान आढळून आले आहे. ज्या घरात कुणी राहत असेल त्या घराला बाहेरून कडी लावून चोरटे शेजारची घरे दिवसाढवळ्या देखील फोडतात. अशा अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे एकीकडे सुट्टीचा आनंद उपभोगायचा असताना दुसरीकडे गावी किंवा बाहेरगावी जाण्यापूर्वी थोडीशी सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.