ठाणे : दिलीप शिंदे
राष्ट्रीय महामार्ग असलेला घोडबंदर रोड हा ठाणे, मुंबई, पालघर आणि गुजरात भागातील वाहतूकीसाठी महत्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावरील खड्डे, त्यातून होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर हैराण झाले आहेत.
दररोज वाहतूक कोंडीचा विस्फोट होऊ लागल्याने अखेर राज्य शासनाने घोडबंदर मार्गावरील अतिशय खराब झालेला गायमुख ते फाऊंटनपर्यंतचा रस्ता मिरा-भाईंदर महापालिकेकडे हस्तांतरीत केला. मात्र जोपर्यंत घोडबंदर रोडवरील मेट्रोचे काम, सर्व्हिस रस्त्याच्या विलिनीकरणाचे काम पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कापुरबावडी ते गायमुखपर्यंतचा रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरीत करून घेणार नसल्याने आणखी एक दोन वर्ष तरी ठाणेकरांना वाहुतक कोंडीचा त्रास सोसावा लागणार आहे.
ठाणे - घोडबंदर या महामार्गाचे सिमेंट काँक्रीटचे बांधकाम २००१ मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने केले होते. या मंडळाने एका खासगी विकासकडून बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर हा रस्ता बांधला होता. या रस्त्यावरील पथकर वसुलीचा कालावधी संपुष्टात येताच २३ फेब्रुवारी २०२१ मध्ये हा रस्ता महामंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केला. मात्र दुरुस्ती अभावी रस्त्याची अवस्था बिकट बनत गेली. कोट्यवधी खर्चुन हायटेक तंत्रज्ञानाद्वारे बनविल्या जाणाऱ्या रस्त्यावर काही महिन्यातच खड्डेच खड्डे पडू लागल्याने वाहतूक कोंडीने प्रवाशी हैराण झालेले आहेत. या वाहतूक कोंडीचा फटका मंत्र्यापासून आमदार आणि सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. अखेर राज्य सरकारने या मार्गावरील फाऊंटन हॉटेल ते गायमुख हा एकूण ४.४० किमी लांबीचा असून हा रस्ता मिरा भाईंदरकडे हस्तांतरित करून त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी दिली आणि उर्वरित रस्ता ठाणे महापालिकेकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव पाठविला. मात्र घोडबंदर मार्गावरील कापुरबावडी ते गायमुखपर्यंतचा १०.५० किमी लांबीचा रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रस्ताव अद्याप कागदावरच ठेवण्यात आलेला आहे.
घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी ते गायमुखपर्यंत दोन मार्गिका काँक्रीटच्या तर, एक मार्गिका डांबराची आहे. या मार्गावर मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या मार्गिका, रस्त्याचे गटर हे एमएमआरडीएने मेट्रो कामासाठी अधिग्रहित केले आहेत. घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते आणि मुख्य रस्ते जोडणीची कामे हाती घेण्यात आली असून ही कामे एमएमआरडीएमार्फत करण्यात येत आहेत. या रस्त्यामध्ये आणि लगत असलेल्या विविध सेवावाहिन्या महापालिकेशी संबंधित आहेत. त्यामुळे या कामात ठाणे महापालिका आणि एमएमआरडीए यांच्यात योग्य समन्वय राहावा, यासाठी हा रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला करून पालिकेला पाठविला. मात्र, पालिकेकडून अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
घोडबंदर रस्त्याखालील आणि लगत असलेल्या अनेक सेवावाहिन्या (उदा. पाणीपुरवठा, गटार इ.) ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत येतात. महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात कामाच्या बाबतीत समन्वय साधण्यात अडचणी येऊन रस्त्याच्या देखभालीच्या कामाला खीळ बसत आहे. रस्ता महापालिकेकडे आल्यास कामात सुसूत्रता येईल आणि जलदगतीने कामे पूर्ण होतील. हा रस्ता ठाणे महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिकेच्या अखत्यारीत येतो.
या रस्त्यावर मेट्रो रेल्वेचे काम सुरु असून त्यावर दोन नवीन उड्डाणपूलही एमएमआरसीएने बांधले आहेत. त्यापैकी कासारवडवली उड्डाणपुलाचे काम अर्धवट असून दुसऱ्या टप्प्यातील काम लवकरच सुरु होणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्याच्या विलीनीकरणाचे काम ही अर्धवट आहे. ही कामे पूर्ण झाल्याशिवाय घोडबंदर रोड हस्तांतरित करून देण्यास आणि घेण्यास पालिका आणि एमएमआरडीएला अडचणी भासत आहेत. त्यामुळे ही सर्व कामे पूर्ण होईपर्यंत घोडबंदर रोड हस्तांतरण होणार नसल्याचे ठाणे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाणेकरांना आणखी काही वर्ष या वाहतूक कोंडीचा त्रास निमूटपणे सहन करावे लागणार आहे, अशी काहीशी परिस्थिती उद्भवली आहे.