भाईंदर : काळे मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील घोडबंदर परिसरात मोठ्याप्रमाणात रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट्स सुरु असून या प्लांट्समधून वातावरणात धूळ उडून मोठ्याप्रमाणात वायू प्रदूषण होते. त्याविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत मुंडे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार एमपीसीबीने घोडबंदर येथील ६ आरएमसी प्लांट्सला नोटिसा बजावून ते तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. या प्लांट्समध्ये माजी आ. गीता जैन यांच्या आरएमसी प्लांटचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
घोडबंदर येथील आरएमसी प्लांट्समधून गंभीर स्वरूपाचे वायू व ध्वनी प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिकांनी सरनाईक यांच्यासह एमपीसीबीकडे केली होती. त्याची गंभीर दखल घेत सरनाईक यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. त्यावर मुंडे यांनी एमपीसीबीला कारवाईचे निर्देश दिल्यानंतर ११ सप्टेंबर रोजी एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी घोडबंदर येथील आरएमसी प्लांट्सची स्थळपाहणी केली.
त्यावेळी त्यांना त्या आरएमसी प्लांट्समधील गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यात आरएमसी मिक्सिंग प्लांट झाकलेला नसल्याने वातावरणात मोठ्या प्रमाणात धूळ उडते. प्लांट्समधील आरएमसी साठवण व कार्यक्षेत्रात पाणी शिंपडण्याची कोणतीही सोय नसल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य पसरते. पर्यावरण नियमानुसार 30 फूट उंच बॅरिकेटेडऐवजी केवळ 10 फूट टिनची भिंत उभारण्यात आली. प्लांटमधील ट्रान्झिट मिक्सर वाहनांसाठी टायर वॉशिंग सुविधा नाही आणि प्लांट्समधील सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन (काँक्रीट पिट) उपलब्ध नाही. वायू गुणवत्तेचे निरीक्षण यंत्र देखील तेथील सर्व्हरशी जोडलेले नाही.
या सर्व त्रुटींमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरून मोठ्याप्रमाणात वायूप्रदूषण वाढून स्थानिकांच्या आरोग्य प्रश्न निर्माण झाल्याचे एमपीसीबीच्या अहवालात नमूद करण्यात आले. प्लांटमधील धुलीकण, रासायनिक प्रदूषण व मोठ्या आवाजामुळे लोकांना श्वसनाचे आजार, ऍलर्जी, दमा आदी गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे. अशातच प्लांटमधील रसायनांमुळे भूमिगत पाणी आणि माती दूषित होत असल्याने शेतजमिनींचे नुकसान व परिसरातील झाडे-झुडपांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
त्याची गंभीर दखल घेत एमपीसीबीने पाणी (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, 1974 मधील कलम 33ए, हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, 1981 मधील कलम 31ए, धोकादायक व इतर कचरा (व्यवस्थापन व सीमा पार हालचाल) नियम, 2016 या कायद्यांतर्गत मेसर्स सोनम बिल्डिंग सोल्युशन्स एलएलपी, मेसर्स जेव्हीआय ऍडव्हान्स टेक्निकल एलएलपी, मेसर्स हिरकॉन इन्फ्रा, मेसर्स राज ट्रान्झिट इन्फ्रा प्रा. लि., मेसर्स ग्रेस सिमेंट्स प्रा. लि., मेसर्स लाईम स्टोन या 6 आरएमसी प्लांट्सना नोटिसा बजावून ते तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच प्लांट्सचा वीज व पाणीपुरवठा तातडीने खंडित करण्याचे निर्देश संबंधित आस्थापनांना देण्यात आले असून त्याचे पालन न केल्यास पर्यावरणीय कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा एमपीसीबीकडून देण्यात आला आहे. यात माजी आ. गीता जैन यांच्या मेसर्स सोनम बिल्डिंग सोल्युशन्स एलएलपी या आरएमसी प्लांटचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
हि फक्त सुरुवात आहे. प्रदूषण करणाऱ्या सर्व युनिट्सविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, अशी आपली मागणी असून पर्यावरणाचे संतुलन तसेच नागरीकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी एमपीसीबीने केलेली कारवाई महत्वाची ठरली आहे. नागरीकांच्या आरोग्याशी कुठल्याही प्रकारची तडजोड होऊ देणार नाही. नागरीकांचे आरोग्य व पर्यावरण संरक्षणासाठी हि लढाई सुरूच राहील.प्रताप सरनाईक , परिवहन मंत्री