प्रजासत्ताकदिनी ‘भारत माता की जय’ घोषणांवरून घाटकोपरमध्ये वाद
घोषणा देणाऱ्या लहान मुलांना हाकलल्याचा आरोप
पालक व स्थानिकांमध्ये हाणामारी; काही जण जखमी
घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; काही जण ताब्यात
किरीट सोमय्यांची पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी
घाटकोपर :
घाटकोपर येथील नित्यानंद नगर परिसरात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्याने वाद निर्माण झाला. झेंडा घेऊन घोषणा देणाऱ्या लहान मुलांना हाकलून लावल्याचा आरोप झाल्यानंतर परिस्थिती चिघळली असून या प्रकरणी घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नित्यानंद नगर परिसरातील डॉक्टर चाळीत काही लहान मुले हातात तिरंगा झेंडा घेऊन ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत होती. यावेळी तेथे राहणारे अजीज खान यांनी मुलांना इथे ओरडू नका असे सांगत त्यांना हाकलून लावल्याचा आरोप आहे. मुलांनी हा प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर पालक जाब विचारण्यासाठी अजीज खान यांच्या घरी गेले.
यावेळी दोन्ही बाजूंनी मोठी गर्दी जमली आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेत काही जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही बाजूंच्या काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी घाटकोपर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांची भेट घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. देशभक्तीच्या घोषणा देणाऱ्या लहान मुलांना धमकावणे, हाणामारी करणे हे खपवून घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली.
या घटनेनंतर घाटकोपर परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.