Gauri Ganpati Pudhari
ठाणे

Gauri Ganpati 2025: ज्येष्ठा गौरी पूजन आणि विसर्जन कधी? पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलं उत्तर

Gauri Aagman Date 2025: रविवार 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.25 पर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असतांना ज्येष्ठा गौरी आणाव्यात.

पुढारी वृत्तसेवा

Gauri Aagman Visarjan 2025 Date and Time

दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक

भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव म्हणजे मातीच्या गणेशमूर्तीचे पूजन करण्यास सांगितले आहे. गणेशपूजनाची सुरुवात सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वींपासून झाली आहे. प्राचीनकाळी शेतावर किंवा नदीकाठी जाऊन तेथील मातीची गणेशमूर्ती तयार करून तेथेच पुजून लगेच विसर्जन करीत असत. त्यानंतर गणेशमूर्ती घरी आणून दीड, तीन, पाच, सात किंवा अनंत चतुर्दशीपर्यंत पूजन करून मूर्तीचे विसर्जन करण्याची प्रथा सुरू झाली.

ज्येष्ठा गौरी पूजन

  1. यावर्षी रविवार 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.25 पर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असतांना ज्येष्ठा गौरी आणाव्यात. सोमवार 1 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचे पूजन करावे आणि मंगळवार 2 सप्टेंबर रोजी रात्री 9-50 पर्यंत मूळ नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचे विसर्जन करावे. गौरी ही गणपतीची माता पार्वती होय. हिला महालक्ष्मी असेही म्हणतात. प्रथेनुसार तेरड्याच्या, खड्यांच्या, मुखवट्यांच्या किंवा मूर्तीच्या रूपात गौरी आणल्या जातात.

  2. गौरीला प्रथेप्रमाणे नैवेद्य अर्पण करतात. काही ठिकाणी चौसष्ट प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. सासरी गेलेली कन्या गौरीच्या सणाला माहेरी येते. तिच्या आवडीचे भोजन केले जाते.

  3. पूजन करावयाची गणेशमूर्ती ही मातीचीच हवी. गणेशमूर्ती लहान असली तरी भक्ती व श्रद्धा मोठी हवी. सजावटीसाठी थर्मोकोलसारख्या पर्यावरणास घातक असलेल्या गोष्टींचा वापर करू नये. आरती ही मधुर स्वरात म्हणावी. अगरबत्ती, धूप, कापूर हे केमिकल फ्री असावेत. गणेशमूर्तीचे विसर्जन हे कृत्रिम तलावातच करावे. आपले सण-उत्सव हे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी असतात. पर्यावरणाचा नाश करण्यासाठी नसतात.

गणेशमूर्ती स्थापनेचा मुहूर्त

यावर्षी बुधवार 27 ऑगस्ट रोजी मध्यान्हकाळ सकाळी 11.25 ते दुपारी 1.54 पर्यंत आहे. यावेळेत श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून षोडशोपचार पूजा करावी. या वेळेत शक्य झाले नाही तर सूर्योदयापासून दुपारी 1.54 पर्यंत गणेशमूर्ती स्थापना व पूजन करावे. गुरुजी उपलब्ध झाले नाहीत तर स्वत: पुस्तकावरून गणेशपूजन करावे. महिलांनीही गणेशपूजन करायला हरकत नाही.

गणपतीचे गुण आपल्या अंगी यावेत, यासाठी गणेशपूजन करावयाचे असते. गणपती हा चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती आहे. आपण आयुष्यात एक विद्या आणि एक तरी कला संपादन करायला हवी. गणेश हा गणांचा नायक आहे. आपण आपल्यातील नेतृत्त्व गुण जोपासायला हवेत. गणपती हा सुखकर्ता, दु:खहर्ता आहे. आपणही इतरांचे दु:ख कमी होण्यासाठी त्यांना मदत करायला पाहिजे. गणेश हा मातृ-पितृभक्त आहे. आपणही आपल्या माता-पित्याचा नीट सांभाळ करायला पाहिजे. गणपतीने अनेक राक्षसांना ठार मारले. आपणही आपल्यातील आळस, अनीती, अनाचार इत्यादी दुर्गुणांचा नाश करायला हवा.

पुढच्या वर्षी 18 दिवस उशिरा आगमन

गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !’ अशी विनंती गणेशभक्त गणेशाला करीत असतात. परंतु पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिकमास येणार असल्याने गणपती बाप्पांचे आगमन 18 दिवस उशिरा म्हणजे सोमवार 14 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT