Ganesh Chaturthi : गौरीला नैवेद्य मटणाचा... होय महाराजा!

कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सवाचा उत्साह पोहोचला शिगेला
Ganesh Chaturthi
रानातून वाट काढत डोक्यावर बाप्पा घेऊन घरी निघालेले चाकरमानी.pudhari photo
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : गणेश जेठे

खड्ड्यांतून कसरत करत, 15-16 तासांचा दमवणारा प्रवास झेलून मुंबईकर चाकरमानी अखेर आपल्या गावच्या लाल मातीत पोहोचला आहे. वर्षभर शांत असलेली कोकणातील गावे आता माणसांच्या गजबजाटाने, हास्य-कल्लोळाने आणि उत्साहाने पुन्हा जिवंत झाली आहेत. मंगळवारी हरितालिकेच्या दिवशी घरोघरी गणरायाचे आगमन होईल आणि बुधवारी चतुर्थीच्या मुहूर्तावर तो भक्तिभावाने आसनावर विराजमान होईल. इथून पुढचे अकरा दिवस कोकणचा हा आगळावेगळा गणेशोत्सव आरत्या, भजने, फुगड्या आणि अनोख्या परंपरांनी रंगत जाणार आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत. अगरबत्ती, धूप, कापूर, मखर आणि सजावटीच्या साहित्याने दुकाने सजली असून, आठवडा बाजारात तर पाय ठेवायलाही जागा नाही. मुंबईकर चाकरमानी आता फारसे सामान सोबत आणत नाही. कारण सर्वकाही आता गावातच उपलब्ध आहे.

सण जो नाती घट्ट बांधून ठेवतो

कोकणातील बहुतांश कुटुंबे नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक झाली आहेत. वर्षभर बंद असलेली त्यांची टुमदार घरे केवळ गणपतीच्या सणासाठी उघडतात. या उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब, भावकी आणि लहान-थोर मंडळी एकत्र येतात, सुख-दुःखाच्या गोष्टी होतात आणि नात्यांची वीण अधिक घट्ट होते. हा सण म्हणजे कोकणी माणसासाठी केवळ उत्सव नाही, तर आपल्या मातीशी आणि माणसांशी पुन्हा एकदा जोडले जाण्याची संधी आहे.

एकाच माटवीखाली तीन गणपतींची अनोखी परंपरा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील काळसे-वरचावाडा येथील केळुसकर कुटुंबीय तब्बल 200 वर्षांपासून एक अनोखी परंपरा जपत आहेत. त्यांच्या 300 वर्षे जुन्या सामाईक घरात एकाच मंचकावर आणि एकाच माटवीखाली तब्बल तीन गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. विशेष म्हणजे, नागपंचमीला देखील येथे तीन नागांची पूजा केली जाते. कोकणात अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आजही श्रद्धेने जपल्या जातात.

कोकणच्या गणेशोत्सवाची खास वैशिष्ट्ये

रानफुलांची सजावट : बाजारात आकर्षक प्लास्टिकची फुले असली तरी, कोकणात आजही गणपतीची मंडपी (माटवी) रानफुलांनी आणि नैसर्गिक पाना-वेलींनी सजवण्याची परंपरा जपली जाते. याला आता आधुनिक लायटिंगच्या तोरणांची जोड मिळाली आहे.

महिलांच्या फुगड्या, पुरुषांची भजने : चतुर्थीपासून प्रत्येक वाडीत घरोघरी जाऊन एकत्रित आरती केली जाते. आरती झाली की पुरुष मंडळी भजनांच्या मैफिलीत रंगून जातात, तर महिला पारंपरिक गाणी गात फेर धरून फुगड्या घालतात. हा सोहळा रात्रभर सुरू राहतो.

गणपतीसमोर पडदा : गौरीला मटणाचा नैवेद्य : पाचव्या दिवशी गौरीचे आगमन होते. कोकणातील अनेक घरांमध्ये गौरीला मटणाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. हा नैवेद्य दाखवताना गणपतीच्या मूर्तीसमोर तात्पुरता पडदा लावला जातो, जेणेकरून गौरीला दाखवलेला नैवेद्य गणपतीला दिसू नये, अशी एक अनोखी श्रद्धा यामागे आहे.

जगप्रसिद्ध कोकणी गार्‍हाणे : गणपती विसर्जनावेळी घातले जाणारे ‘गार्‍हाणे’ हे कोकणच्या संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. आमच्याकडून काही चूक-भूल झाली असेल तर माफ कर देवा, सर्वांना सुखी ठेव, अशी आर्त विनवणी यात केली जाते. होय देवा महाराजा! म्हणत देवाला साद घातली जाते आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! या जयघोषात बाप्पाला निरोप दिला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news