डोंबिवली शहर (ठाणे) : संस्कृती शेलार
गणेशोत्सव जसजसा जवळ येतो, तसतसा पीओपी मूर्तींवरचा वाद पुन्हा एकदा डोकं वर काढतो आहे. दरवर्षी तो च खेळ पीओपीवर बंदी, मग परवानगी, मग विसर्जनावर अटी आणि नंतर फटकारणी पण या सगळ्यात मूर्तिकारांचा विचार कोण करतो? अखेरीस मूर्तिकारांच्या घामाला, श्रमांना, भावनांना आणि व्यवसायाला किंमत आहे की नाही? असा सवाल उपस्थित झाला आहे.
यंदाही वेगळे काही घडले नाही. पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली आधी बंदीची घोषणा झाली आणि मग जुलै महिन्याच्या उंबरठ्यावर परवानगी ही मिळाली. पण, या दोलायमान धोरणांचा फटका कोणाला बसतो? अर्थात, मूर्तिकारांना! एकीकडे बंदीच्या भीतीनं मातीच्या मूर्ती घडवल्या, तर दुसरीकडे उशिरा ‘पीओपी चालेल’ असा निर्णय दिला आणि मूर्तिकार संभ्रमात दिसत आहेत. मग मूर्तिकाराच्या रोजीरोटीचं काय? दरवर्षी पीओपी साकारण्यात येणार्या मूर्तींवर बंदी घालण्यात येते, मात्र हा निर्णय प्रत्यक्षात कितपत अंमलात आणला जातो, यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, पीओपीपासून तयार करण्यात आलेल्या मूर्ती आणि त्यांच्या विक्रीवर बंदी नसल्याची सुधारित भूमिका 9 जून रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी मांडली होती. या भूमिकेमुळे पीओपी मूर्तींचे उत्पादन आणि विक्रीवर घातलेली बंदी उठविण्यात आली. मात्र, पीओपीच्या नैसर्गिक जलस्रोतातील विसर्जनाला मनाई कायम राहील. त्याचाच भाग म्हणून पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात केले जावे, असे स्पष्ट करण्यात आले. मूर्तीकार व कारागिरांना पीओपीचा वापर करून मूर्ती तयार करण्याची मुभा राहील, परंतु या मूर्तींचे कोणत्याही नैस्रर्गिक तलावात विसर्जन होणार नाही ही बाब लक्षात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
महाराष्ट्रात पीओपी मूर्तींमुळे पर्यावरणावर होणार्या संभाव्य परिणामांची चर्चा रंगली असतानाच, डोंबिवलीतील शिवशक्ती मित्र मंडळ, गणेशनगर यांनी एक पर्यावरणपूरक पाऊल उचलले आहे. तर सरकार, उच्च न्यायालय, मूर्तिकार आणि मंडळांमध्ये सुरू असलेल्या या वादात न अडकता, शिवशक्ती मित्रमंडळाने एक जबाबदार नागरिकत्व स्वीकारले. आपण काय करू शकतो? या विचारातूनच यंदा कागदी, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या संकल्पनेची अंमलबजावणी शक्य झाली ती डोंबिवलीचे प्रसिद्ध मूर्तिकार दिनेश पिसे यांच्या कलागुणांमुळे. ही कागदी मूर्ती अत्यंत हलकी असून विरघळणारी, निसर्गस्नेही आणि सौंदर्यपूर्ण आहे, असे शिवशक्ती मित्र मंडळ, गणेश नगर अध्यक्ष अपूर्व दत्तात्रय कदम यांनी सांगितले.
आता 9 जूनला न्यायालयाचा निर्णय आला. आधी सुनावणी झाली होती, मग आम्ही पेणला मूर्ती आणायला गेलो. मात्र तिथे सांगितले की, न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत आम्ही मूर्ती देऊ शकत नाही, कारण मागच्या वर्षी विसर्जनाला नेलेल्या मूर्ती परत पाठवली होती. नंतर जेव्हा न्यायालयाचा निर्णय आला, पीओपी मूर्तीला परवानगी आहे, फक्त कृत्रिम तलावात विसर्जनाची अट तेव्हा आमचे थोडेसे समाधान झाले. गणेशभक्त आम्हाला विचारतात की विसर्जन कुठे करायचे? आम्हीही महापालिकेला विचारतो की, विसर्जनाची सुविधा तरी द्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे सोशल मीडियावर रीलसाठी व्हीडिओ काढतात, त्यामुळे चुकीचे चित्र पसरते.विजय चव्हाण, मूर्तिकार, विघ्नहर्ता आर्ट स्टुडिओ
आम्ही मे महिन्यापासून मूर्ती तयार करायला सुरुवात केली. त्यावेळी पीओपीवर बंदी असल्याने मातीच्या मूर्ती बनवत होतो. पण, 9 जूनला अचानक सरकारने आपली भूमिका बदलली व पीओपी मूर्तींना परवानगी दिली. त्यामुळे पुन्हा नव्याने पीओपी मूर्ती तयार कराव्या लागल्या. आता गणेशभक्त मूर्ती घ्यायला येतात, मातीच्या मूर्ती कोणी घेत नाही. वेळेत निर्णय घेतला असता, तर आमच्या श्रम, खर्चाचे इतके नुकसान झाले नसते.निनाद खोपडे, मूर्तिकार, खोपडे कला केंद्र