गणेश भक्तांनी दीड दिवसापासून आजतागायत बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावाला प्राधान्यक्रम दिला आहे.  Pudhari News Network
ठाणे

Ganesh Visarjan : कल्याण-डोंबिवलीकर गणेशभक्तांचा कृत्रिम तलावांकडे वाढता कल

विसर्जनस्थळांहून 32 टन निर्माल्याचे संकलन

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली (ठाणे) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी केलेल्या आवाहनाला कल्याण-डोंबिवलीकर गणेशभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दीड दिवसापासून आजतागायत बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावाला प्राधान्यक्रम दिला आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत नैसर्गिक आणि कृत्रिम तलावांजवळून तब्बल 32 टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे.

कल्याण-डोंबिवली परिक्षेत्रातील पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे रविवारी श्रद्धापूर्वक आणि भक्तीमय वातावरणात विसर्जन पार पडले. जलप्रदूषण टाळण्यासाठी, पर्यावरणाचे संतुलन राखण्याकरिता शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार 6 फुटापेक्षा कमी उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम विसर्जन तलावात करावे, अशा आयुक्त अभिनव गोयल यांनी केलेल्या आवाहनानुसार कल्याण-डोंबिवली परिक्षेत्रातील 5 दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी गणेशभक्तांनी महानगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांनाच विसर्जनासाठी प्राधान्यक्रम दर्शविला होता. गणेशभक्तांना आपल्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावात/कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जित करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता, तसेच जनमानसाची याबाबतची मानसिकता दृढ करण्यासाठी कृत्रिम विसर्जन तलावात गणेशमूर्ती विसर्जन करणार्‍या गणेश भक्तांचे महापालिकेच्या अधिकार्‍यांमार्फत गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच काही प्रभागात गणेशभक्तांना सन्मानपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

महापालिका क्षेत्रात रविवारी रात्री उशिरापर्यंत 7 हजार 419 शाडू आणि 10 हजार 752 पीओपी, अशा एकूण 18 हजार 171 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यासाठी महापालिकेने सर्व प्रभागातील विसर्जन स्थळांवर कृत्रिम विसर्जनासाठी निर्माल्य कलश, अग्निशमन यंत्रणा, वैद्यकीय पथक, डस्टबिन, इत्यादी व्यवस्था चोख ठेवली होती. सर्व विसर्जनस्थळी विसर्जन प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशांनुसार दुर्गाडी, मोठा गाव, कुंभारखान पाडा या महत्त्वांच्या विसर्जन स्थळांवर 10 दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होईपर्यंत खास अधिकार्‍यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. विसर्जनस्थळांवर घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत निर्माल्य कलश, डस्टबिन, साफ-सफाईसाठी मनुष्यबळ देण्यात आले आहे. तसेच मोठ्या गणेशमूर्तींसाठी फोर क्लिप आणि हायड्राची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

विसर्जन स्थळांची पाहणी...

रविवारी सर्व विसर्जनस्थळी निर्माण झालेले सुमारे 32 टन निर्माल्य ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि गणेश मंदिर येथील खत प्रकल्प, तसेच महापालिकेचे बायोगॅस व खत प्रकल्प येथे पाठविण्यात आले. अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाडआणि उपायुक्त समीर भूमकर यांनी इतर अधिकार्‍यांसमवेत स्वत: विसर्जन घाट आणि स्थळांवर जाऊन विसर्जन प्रक्रियेची पाहणी केली.

विसर्जन स्थळे गुगल मॅपद्वारा प्रदर्शित

महापालिकेने यावर्षी प्रथमच प्रभागनिहाय विसर्जन स्थळे गुगल मॅपद्वारा प्रदर्शित केल्यामुळे गणेशभक्तांना आपल्या मूर्तींचे विसर्जन करणे सुलभ आणि सोयीचे झाले आहे. महापालिकेने ठिकठिकाणी केलेल्या कृत्रिम विसर्जन स्थळांच्या व्यवस्थेबाबत गणेशभक्तांनी व्यक्त केले. शासनाच्या निर्देशांनुसार मंगळवारी देखील गणेश भक्तांनी त्यांच्याकडील 6 फुटापेक्षा कमी उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन महापालिकेच्या कृत्रिम तलावात करून पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त अभिनव गोयल यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT