कल्याण-डोंबिवलीत अनंत चतुर्दशीसाठी पोलीस अलर्ट मोडवर (Pudhari File Photo)
ठाणे

Ganesh Visarjan 2025: कल्याण-डोंबिवलीत अनंत चतुर्दशीसाठी पोलीस अलर्ट मोडवर, अशी आहे बंदोबस्त व्यवस्था

Security arrangements | ११७३ अधिकारी/कर्मचारी/होमगार्ड्स एसआरपीच्या २ प्लॅटून तैनात

पुढारी वृत्तसेवा

Anant Chaturdashi

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागातून उद्या अनंत चतुर्दशीला १४ हजार ४८३ गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे. यात सार्वजनिक १७३, तर घरगुती १४ हजार ३१० गणपतींचा समावेश आहे. संध्याकाळ नंतर निघणाऱ्या मिरवणुकी आणि विसर्जन घाटांच्या दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडून कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलिसांकडून सर्वत्र तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात बुधवारी २७ ऑगस्ट रोजी गणेशचतुर्थी दिनी बाप्पाचा जयघोष करत ५२ हजार ४७८ गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आल्या. यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या २९३, तर ५२ हजार १८५ घरांमध्ये बाप्पांचा समावेश होता. त्यानंतर दीड, पाच, सात दिवसांच्या गणपतींचे मोठ्या भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. उद्या शनिवारी १४ हजार ४८३ गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे.

कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यांतर्गत सार्वजनिक सार्वजनिक ३७, घरगुती ७००, बाजारपेठ पोलिस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ३२, घरगुती ९५०, कोळसेवाडी पोलिस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ३५, घरगुती ५ हजार २९०, खडकपाडा पोलिस ठाण्यांतर्गत सार्वजनिक १३, घरगुती ८८०, डोंबिवलीतील रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक १०, घरगुती २ हजार ३१५, विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक २०, घरगुती ९२५, मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक १७, घरगुती १२ हजार आणि टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ९, घरगुती २५० अशा एकूण १४ हजार ४८३ मूर्तींचे वेगवेगळ्या स्थळांवर विसर्जन करण्यात येणार आहे.

अशी आहे बंदोबस्त व्यवस्था

विसर्जन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कायदा, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्याची योजना आखली आहे. कल्याणात सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, तर डोंबिवलीत सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हमाडे यांच्यासह २५ पोलिस निरीक्षक, ११७ सहाय्यक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक, ७०५ पुरूष कर्मचारी, २१३ महिला कर्मचारी, ८४ पुरूष होमगार्ड, २६ महिला होमगार्ड, तसेच राज्य राखीव पोलिस दलाच्या २ तुकड्या, असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय पोलिस मित्रांना बरोबर घेऊन साध्या वेशातील पोलिस गस्ती घालणार आहेत.

विसर्जनासाठी चोख व्यवस्था

गणेश मूर्तींच्या विर्सजनासाठी कल्याणात २२ नैसर्गिक, तर ३६ कृत्रिम तलाव उपलब्ध आहेत. डोंबिवली विभागात ३० नैसर्गिक, तर २७ कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यानजीकचा गणेश घाट, काळा तलाव, गौरी पाडा तलाव, आधारवाडी कारागृह तलाव, डोंबिवलीमध्ये रेतीबंदर, गणेश घाट, याच्यासह १७ ठिकाणच्या खाडी किनारपट्टी भागातील गणेश घाट तलावांत विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून खाडी किनारी, गणेश घाट आणि कृत्रिम तलावांच्या ठिकाणी मूर्तींच्या विसर्जनाची चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचा चौफेर वॉच

महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत ७६ विसर्जनस्थळी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. २ हजार ४७५ हॅलोजन, ५५८ एलईडी, १०५ लाईटनिंग टॉवर तसेच ३८ प्रमुख लोकेशन्सवर २१२ सीसीटीव्हीची कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महानगरपालिकेने विसर्जनस्थळांवर फायर ब्रिगेड, स्वयंसेवक, रबर बोट, आदी साहित्य सज्ज करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT