अंबरनाथ : प्रेमाने सोबत राहिला तर त्रास ही सहन करू, पण कोणी बाप होण्याचा प्रयत्न केला तर, त्याला बाप दाखवू. असा इशारा शिवसेनेचे नाव न घेता वन मंत्री गणेश नाईक यांनी शिवसेनेला दिला. भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले-पाटोल यांच्या प्रचारार्थ वन मंत्री गणेश नाईक यांनी शहरातील प्रमुख पदाधिकारी व उमेदवारांशी संवाद साधला. यावेळी नाईक यांनी उपरोक्त इशारा दिला.
अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही महापालिका होण्यासारखी आहे. दोन महापालिका होण्यासाठी प्रयत्न करू. तर येत्या सहा महिन्यात अंबरनाथ मध्ये परिवहन सेवा सुरू करण्याची ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. नवी मुंबईत तीस लाख लोकसंख्या होईपर्यंतची एसटीपी ची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या अखत्यारीत मोरबे धरण असून 500 एमएलडी इतक्या पाण्याची तरतूद केलेली आहे. दिव्यांगासाठी नवी मुंबईमध्ये शाळा चालवतो. ती पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या शाळा येतात. असाच विकास अंबरनाथचा देखील करायचा आहे. अंबरनाथला आपण दत्तक घेऊ असे ही नाईक यांनी सांगितले.
अंबरनाथ, बदलापूरमध्ये भाजपाची सत्ता असेल
अंबरनाथ मधील भ्रष्टाचार संपवायचा असेल तर आपल्याला सतर्क राहायला हवे. अंबरनाथ, बदलापूर मध्ये भाजपाची सत्ता असेल. नवी मुंबईत देखील भाजपाची सत्ता आणू. पुढे भाईंदर, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महापालिका ही साफ करू असे ही नाईक म्हणाले. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, गुलाबराव करंजुले- पाटील आदी उपस्थित होते.