भाईंदर : मिरा-भाईंदर मधील बहुतांशी झोपडपट्ट्या कांदळवनाने प्रभावित झाल्याने या क्षेत्रातील झोपडीधारकांना पुरेशा शौचालयांची सोय उपलब्ध होत नाही, तर अस्तित्वातील शौचालयांच्या दुरुस्तीसाठी वनविभागाची परवानगी अत्यावश्यक ठरते. ही परवानगी मिळणे कठीण होत असल्याने ही समस्या मार्गी लावण्यासाठी शनिवारी आयोजित वनमंत्री तथा मिरा-भाईंदर संपर्क मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात माजी नगरसेवक दरोगा पांडेय यांनी वनमंत्र्यांना निवेदन दिले. त्यावर वनमंत्र्यांनी कांदळवनातील रहिवासी क्षेत्र वगळून उर्वरित कांदळवन क्षेत्रादरम्यान भिंत बांधून रहिवासी क्षेत्रातील विकासाचा प्रश्न सोडविणार असल्याचे स्पष्ट केले.
यामुळे कांदळवन क्षेत्रातील झोपडीधारकांना दिलासा मिळाला आहे. मिरा-भाईंदरमधील बहुतांशी झोपडपट्ट्या व बांधकामे मोठ्याप्रमाणात कांदळवनाने प्रभावित झाल्याने त्याचा परिणाम येथील विकासकामांवर झाला आहे. येथील रहिवाशांना नवीन बांधकामे करता येत नाहीत तसेच त्यांना विद्युत व पाणीपुरवठा करण्यासाठी वनविभागाची परवानगी मिळवावी लागते.
अशातच येथील झोपडीधारकांसाठी शौचालयांची पुरेशी सोय उपलब्ध नाही आणि जी शौचालये आहेत, त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्याने त्यांची दुरुस्ती अत्यावश्यक बनली आहे. मात्र त्या शौचालयांची दुरुस्ती करण्यासाठीही वनविभागाची परवानगी आवश्यक ठरल्याने येथील रहिवाशांना खराब अवस्थेतील शौचालयाचा वापर करावा लागतो. तर नव्याने शौचालय बांधण्यात वनविभागाच्या परवानगीचा अडसर निर्माण झाल्याने ही समस्या मार्गी लावण्यासाठी काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. रवि व्यास यांनी वनमंत्र्यांना पत्रव्यवहार करीत साकडे घातले होते. तर शनिवारी वनमंत्र्यांच्या जनता दरबाराचे आयोजन मीरारोडच्या आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात करण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेवक दरोगा पांडेय यांनी वनमंत्र्यांना पुनःश्च निवेदन देत कांदळवनातील झोपडीधारकांच्या समस्या मार्गी लावण्याची मागणी केली.
रहिवासी क्षेत्रात वाहणार विकासगंगा
वनमंत्र्यांनी कांदळवन क्षेत्रातील रहिवासव्याप्त क्षेत्राचा विकास करण्याच्या अनुषंगाने उर्वरित कांदळवन क्षेत्रादरम्यान भिंत बांधून ही दोन्ही क्षेत्र विभाजित करण्यात येतील, असे स्पष्ट केले. तसेच येथील अत्यावश्यक विकासकामे करण्यासह त्यांना परवानगी देण्याचे निर्देश पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना दिले. यामुळे कांदळवनाच्या रहिवासी क्षेत्रातील विकासाची गंगा पुन्हा वाहणार असल्याचा दिलासा येथील रहिवाशांना मिळाला आहे.