खासदार नरेश म्हस्के pudhari photo
ठाणे

Naresh Mhaske : शिवसेनेला संपवण्याची नाईकांना द्यावी परवानगी

खासदार नरेश म्हस्के यांचे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : वनमंत्री गणेश नाईक आणि शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शीतयुद्ध चांगलेच तापले आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरही नाईक यांनी भाजप पक्षाने परवानगी दिली तर शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकू, असे जाहीरपणे बोलून शिंदे यांना लक्ष केले. त्यामुळे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहून नाईक यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावीच. आमची तयारी आहे, असे म्हणत नाईक यांना लक्ष केले आहे.

वनमंत्री गणेश नाईक यांनी सातत्याने उपमुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष करीत टांगा गायब करीत शिवसेना संपवण्याची भाषा केली आहे. त्यांना प्रत्युत्तर देताना खासदार म्हस्के यांनी एक्स पोस्ट करीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहिले आणि दोन हात करण्याची तयारी दर्शवली. ते म्हणतात पत्रास कारण की, नवी मुंबईतील आपले ज्येष्ठ नेते गणेश नाईकसाहेब यांनी आपले मित्र पक्ष असलेल्या राज्य आणि अनेक महानगरपालिका नगरपालिकांमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या, युती म्हणून लढून युती म्हणून जिंकून आलेल्या शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला आहे.

एकेकाळी स्वतः शिवसैनिक असलेल्या गणेश नाईक यांनी आमचे प्रमुख नेते राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांना अनेक वेळा डिवचून नवी मुंबईतून शिवसेनेला धोबीपछाड देण्याचे, टांगा पलटी करण्याचे आणि शिवसेनेला नवी मुंबईतून मुळातून संपवून टाकण्याचे स्पष्ट इरादे अनेक प्रसारमाध्यमातून जाहीर रित्या मांडले आहेत. आता तर त्यांनी जाहीरपणे, पक्षाने परवानगी दिली तर शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकू, असे बेताल वक्तव्य केले आहे. मी तमाम शिवसैनिकांच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने आपल्याला विनंती करतो की त्यांच्या ह्या त्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावीच. आमची तयारी आहे.

सगळीकडे युती असताना युतीतल्या मोठ्या घटक पक्षाबद्दल असे विधान वारंवार करणे म्हणजे आपल्या पक्ष नेतृत्वावरच अविश्वास दाखवण्यासारखे आहे. एखाद्या व्यक्तीवरचा राग समजू शकतो परंतु, त्यासाठी पक्ष, पक्षीय भूमिका, पक्षाचा अजेंडा या सगळ्या बाबी धुडकावून लावत गणेश नाईक आमचे नामोनिशाण मिटवण्याचे वक्तव्य करीत आहेत.

आज नवी मुंबईत दहा जागाही शिवसेनेच्या निवडून येऊ शकत नाहीत अशा वल्गना करणाऱ्या नाईक यांना आम्ही 42 जागा निवडून आणून दाखवले आहे. कदाचित त्यामुळेच त्यांची अस्वस्थता वाढलेली असू शकते. दिवस रात्र लोकांच्यासाठी कार्यरत असणाऱ्या शिंदे साहेबांवर त्यामुळेच त्यांचा राग असू शकतो. तेव्हा त्यांच्या सर्व वक्तव्यांचा सखोल विचार करून त्यावर चिंतन करून आपण त्यांना शिवसेना संपवण्याची जबाबदारी देऊन टाकावीत ही नम्र विनंती.

आपल्या पक्षात पक्षश्रेष्ठीचा भंग करणारे नेते पक्षाची रचना आणि अध्यक्षांचे निर्णय याला न जुमानता मनमानी करत आहेत असे तुम्हाला वाटते का हो? कधीकधी तर आम्हाला असे वाटते की शिंदे साहेबांपेक्षा गणेश नाईक साहेबांचा पक्ष नेतृत्वावरच अविश्वास आहे आणि त्यामुळेच ते असे बेताल वर्तन बेचुटपणे करू शकतात. त्यांच्या उचललेल्या प्रत्येक पावलाचा सखोल अभ्यास आणि चिंतन करून तुम्ही त्यांना पुढील जबाबदारी सोपवाल अशी अपेक्षा आहे, असे म्हणत म्हस्के यांनी नाईक यांना डिवचले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT