

मिरा रोड : प्रजासत्ताक दिनाच्या पहाटे भाईंदर रेल्वे स्थानकाजवळील एका ऑर्केस्ट्रा बारवर नवघर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. मिड लाईफ ऑर्केस्ट्रा बारमध्ये बेकायदेशीररीत्या अश्लील नृत्य सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत बार मॅनेजरसह 15 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, बार मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 26 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नवघर पोलिसांनी भाईंदर येथील मिड लाईफ ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकला. यावेळी बारमध्ये नियमांचे उल्लंघन करून महिलांना अश्लील नृत्य करण्यास भाग पाडले जात असल्याचे आढळून आले. वारंवार सूचना देऊनही बार व्यवस्थापनाने मुलींच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असे वर्तन आणि अश्लील नृत्यास प्रोत्साहन दिल्याने ही कारवाई करण्यात आली.
या छाप्यात पोलिसांनी बार मॅनेजर (कॅशिअर), 13 वेटर आणि 1 पुरुष वादक अशा एकूण 15 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बारचा मालक आणि चालक फरार आहेत. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 30,040 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे.
याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र हॉटेल, उपगृहे आणि मद्यपान कक्ष (बाररूम) यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध व महिलेच्या प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनियमाचे विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवास गारळे हे करत आहेत.