मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदाच्या गणेशोत्सवात नैसर्गिक जलस्रोतात ६ फुटांखालील गणेश मूर्तीच्या विसर्जनाला बंदी घालून या मूर्ती कृत्रिम तलावांत विसर्जित करण्याचा फतवा काढला Pudhari News Network
ठाणे

Ganesh Chaturthi : पालिकेचे कृत्रिम तलाव वादात ?

विसर्जित मूर्ती फेकल्या जात असल्याचा आ. नरेंद्र मेहतांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर (ठाणे) : मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदाच्या गणेशोत्सवात नैसर्गिक जलस्रोतात ६ फुटांखालील गणेश मूर्तीच्या विसर्जनाला बंदी घालून या मूर्ती कृत्रिम तलावांत विसर्जित करण्याचा फतवा काढला. या कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती पालिका कर्मचाऱ्यांकडून नावापुरती विसर्जित करून त्या एका ठिकाणी ठेवल्या जात नाहीत तर त्या अक्षरशः फेकल्या जात असल्याचा आरोप आ. नरेंद्र मेहता यांनी केला आहे.

त्याचा पुरावा म्हणून आपल्याकडे या घटनेची चित्रफीत व छायाचित्र असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पालिकेने कृत्रिम तलावाच्या नावाखाली दोन डबके एकत्र करून त्यावर ताडपत्री टाकली आहे. विसर्जनासाठी पालिकेने योग्य व्यवस्था केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कृत्रिम तलावांमध्ये ६ फुटाखालील गणेश मूर्तीना विसर्जित करण्याचा फतवा काढल्याचे त्यांनी सांगितले.

या तलावांमध्ये गणेशभक्तांना थेट विसर्जन करण्यास मनाई केली जात असून या मूर्तीचे विसर्जन पालिका कर्मचाऱ्यांकडून केले जाते. हे विसर्जन देखील शास्रोक्त पद्धतीने न करता ते नावापुरते केले जात असून मूर्ती लगेच तलावाच्या बाहेर काढुन त्या एका बाजूला ठेवल्या जात नाहीत तर त्या अक्षरशः फेकल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा कृत्यामुळे त्या मूर्तीनची विटंबना होत आहे. मात्र त्यावर प्रशासनाकडून गंभीर्य दाखविले जात नाही.

यामागे गणेश भक्तांच्या भावना जोडल्या गेल्या असल्याचे भान देखील प्रशासनाला नसल्याचा आरोप मेहता यांनी केला आहे. बरं! तलावाबाहेर काढलेल्या मूर्तीचे पालिका काय करणार त्याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. मग या मूर्ती उत्तनच्या डपिंग ग्राऊंडमध्ये टाकल्या जाणार कि त्या इतर ठिकाणी टाकल्या जाणार, त्यावरही प्रशासन ठाम नसल्याने मूर्तीची अशी विटंबना होण्यास आयुक्त व अधिकारी पूर्णतः जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गणेशभक्तांनी घरीच मूर्तीचे विसर्जन करावे

पालिकेच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी नसल्याचा गैरफायदा प्रशासनाकडून घेतला जात आहे. आणि सध्या लागू असलेल्या प्रशासकीय राजवटीच्या आडून प्रशासनाचा मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. पालिकेच्या अशा गैरव्यवस्थेत गणेश मूर्तीची विटंबना होऊ नये, यासाठी गणेशभक्तांनी घरीच पर्यावरणपूरक मूर्तीचे विसर्जन करून त्यांची माती झाडांना घालावी अथवा त्यात वृक्षारोपण करावे, अशी विनंती त्यांनी शहरातील गणेशभक्तांना केली आहे.

दीड दिवसाच्या गणेश विसर्जनावेळी झाला तीव्र विरोध

पालिकेच्या व्यापक स्वरूपातील जनजागृती अभावी कृत्रिम तलावातील विसर्जनाला भाईंदर येथील राई, मोर्वा गावातील ग्रामस्थांनी दीड दिवसाच्या गणेश विसर्जनावेळी तीव्र विरोध केला. यावेळी पालिकेने तेथील नैसर्गिक तलावांना टाळे ठोकून त्याठिकाणी साकारलेल्या कृत्रिम तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यास ग्रामस्थांना सांगण्यात आले. यावर संतप्त ग्रामस्थांन नैसर्गिक तलावाचे टाळे तोडून त्यात गणेश विसर्जन केले. याप्रकरणी पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी संबंधित ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश भाईंदर पोलिसांना दिले आहेत. याबाबत भाईंदर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक जितेंद्र यांना संपर्क साधला असता त्यांनी याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT