Ganesh Chaturthi  Pudhari Photo
ठाणे

Ganesh Chaturthi : गणेशोत्सवात कोकणचा प्रवास सुखकर! मुंबई - गोवा महामार्गावर दर १५ कि.मी.वर 'सुविधा केंद्र'

चाकरमान्यांसाठी सुविधा आणि सुरक्षेचे कवच : अपर पोलीस महासंचालक प्रविण साळुंके

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर एसटीच्या पाच हजार बसेस धावणार असल्याने गणेश भक्तांच्या सेवा सुविधांसाठी दर 15 कि.मी. अंतरावर “सुविधाकेंद्र” उभारण्यात येणार असून, या सुविधा केंद्रात पोलीस मदत कक्ष, आरोग्य विषयक सुविधा, शौचालय, चहापान कक्ष, स्तनदा मातांसाठी स्वतंत्र कक्ष असेल. तसेच वाहनांच्या दूरुस्तीचीही व्यवस्था, वैद्यकीय मदतीसाठी 23 ठिकाणी रुग्णवाहिका तैनात, महामार्गावरील ब्लॅक स्पॉट, रस्ते दुरुस्ती तसेच वाहनांची वर्दळ नियंत्रीत करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचे अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) प्रविण साळुंके यांनी आज झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.

गणेशोत्सव काळात गणेश भक्तांना त्यांच्या गावी वेळेत पोहचता यावे व गणेशोत्सवा दरम्यान वाहतुक कोंडी न होता हा सण निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस रायगड पोलीस अधिक्षक (महामार्ग) तानाजी चिखले, नवी मुंबई पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, आय.आर.बी, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग या विभागातील अधिकारी तसेच कोकण विभागातील पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक, सहायक पोलीस अधिक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पुणे विभागाचे महामार्ग पोलीस अधिक्षक उपस्थित होते.

गणेशोत्सवादरम्यान येणाऱ्या शासकीय सुट्टयांमुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरील वाहतुक कोंडी लक्षात घेता पोलीस प्रशासनामार्फत वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात आले असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) साळुंके यांनी दिली. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अंतर्गत मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर गणेशोत्सव काळात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी डेल्टा फोर्स व पेट्रोलिंग वाहनांची गस्त वाढविण्यात आली आहे. घाट क्षेत्रातील दरड कोसळणाऱ्या ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. महामार्ग क्र. 48 वर किरकोळ दुरुस्ती अंतर्गत खड्डे बुजविणे, बाजूपट्ट्या दुरुस्त करणे, लेन मार्केटिंग करणे, माहिती फलक स्वच्छ करणे इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत. बोर घाटात अपघात कालीन परिस्थिती उद्भवल्यास एकूण 4 ठिकाणी वाहतुक नियंत्रण व नियोजन करण्यासाठी घाट निरिक्षक प्रतिसाद पथक 24 तास तैनात करण्यात आले आहे.

चालक आणि वाहक यांची अल्कोहोल चाचणी

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत 23 ते 27 ऑगस्ट या कालावधीत 5 हजार बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषत: माणगाव आणि इंदापूर एसटी डेपोच्या परिसरातील बसेसच्या पार्किंगमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचे नियोजन करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. अपघात टाळण्याकरिता चालक आणि वाहक यांची अल्कोहोल चाचणी करण्यात येणार आहे. सहा अपघात प्रवण क्षेत्रात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे फिरते पथक तैनात ठेवण्यात येणार आहेत. बसस्टँडवरील चोरी सारखे अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व प्रकारची काळजी मंडळामार्फत घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या प्रतिनिधींनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT