सापाड (ठाणे) : योगेश गोडे
कल्याण डोंबिवलीसह ग्रामीण भागात सुरू आसणार्या मुसळधार पावसाचा परिणाम ढोलताशा पथकांवर झालेला दिसून आला. यावेळी दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी गणेशभक्तांनी खासगी वाहनांना पसंती दिल्यामुळे ढोलताशा पथकांकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
गणेशभक्तांकडून गणपती विसर्जनाची मिरवणूक रद्द करून गणरायाला खासगी वाहनात बसवून थेट विसर्जन तलावाकडे घेऊन जाण्यात येत असल्याने बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत महत्वाची भूमिका बजावणार्या ढोलताशा पाथकांवर आर्थिक संक्रांत ओढवली आहे. त्यामुळे बाहेरगावातून येणार्या ढोलताशा वाजत्र्यांना पावसाने विश्रांती घेतली नाही तर परतीच्या प्रवासासाठी पैसे मिळणार नसल्याने विना तिकीट घर गाठावे लागणार आसल्याची खंत चाळीसगाव जिल्ह्यातील ढोलताशा वाजंत्रीक विकी भिसे यांनी दैनिक पुढारीशी बोलतांना व्यक्त केली.
गणरायाचे विसर्जन करण्यासाठी गणेशभक्तांनी खाजगी वाहनांना पसंती दिल्यामुळे ढोलताशा पाथकांवर रोजंदारीचे संकट निर्माण झाले आहे. मुंबईत येणारे ढोलताशे पथके ही प्रामुख्याने बुलढाणा, नाशिक, अकोला, चिखली, धुळे, चाळीसगाव या शहरातून येत असतात. मात्र आठवडा महाराष्ट्रात पावसाने घातलेले धुमाकुळ ढोलताशे पथकांवर संक्रांत ओढवत आहेत. मुसळधार पावसाच्या कोसळणार्या सरींमुळे गणेशभक्तांकडून बाप्पा विसर्जन मिरवणूका रद्द करण्यात आल्याने ढोलताशा वाजत्र्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. येणार्या अनंत चतुर्थीच्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली नाही तर वर्षभराचे नियोजन बिघडण्याची शक्यता वर्तवत आर्थिक संकट ओढवणार असल्याची भीती ढोलताशे पथकांना सतावू लागली आहे. येणार्या दिवसात पथकांवर पाऊस थांबण्याची वाट पाहण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नाही.
गेल्या आठवडा भारतापासून मुसळधार पावसामुळे आम्हाला रोजंदारी मिळाली नाही. मात्र गणरायाला आम्हा ढोलताशा पथकांची काळजी आहे. येणार्या अनंत चतुर्थीच्या दिवशी पाऊस कमी होऊन गणेश भक्तांचा उत्साह पुर्वरत होऊन आम्हाला भरपूर रोजंदारी मिळू शकेल. गेलेले दिवस आमच्या नशिबी नव्हते मात्र येणार्या दिवसात गणपती बाप्पा आम्हाला नाराज करणार नसल्याचा विश्वास आम्हा संपूर्ण वाजंत्रीकांना आहे.रतन लक्ष्मण पाखरे, ढोलताशा वाजंत्रीक, चाळीसगाव
आम्हाला कल्याणात येऊन चार दिवस झाले आहेत. कल्याणात आल्यापासून पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. आज दीड दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत अपेक्षेप्रमाणे रोजगार मिळाला नाही. आठवडाभरापासून कोसळणार्या मुसळधार पावसामुळे गणेश मंडळांकडून वाजवण्याची संधी आम्हाला दिली नाही. गणेश भक्तांनी आपले बाप्पा खाजगी वाहनातून विसर्जन घाटापर्यंत नेण्यात आल्यामुळे बाप्पाच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रोजंदारी नसल्याने संपूर्ण पथकाचे पोट भरणेही कठीण झाले आहे.विकी भिसे, ढोलताशा वाजंत्रीपथक, चाळीसगाव