ठाणे : गायमुख घाटाचे मिराभाईंदर हद्दीतील कामे पूर्ण झाले आहे. मात्र ठाण्याकडील हद्दीचे काम आजही रखडले असल्याचा मुद्दा समोर आला आहे. ठाणे महापालिका की सार्वजनिक बांधकाम या दोघांमध्ये असलेल्या सम्नवयाच्या अभावामुळे या रस्त्याचे काम रखडल्याची माहिती समोर आली आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत आहे. परंतु हे काम करण्याबरोबरच रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे ही आम्हीच करतो.
ही कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करत नाही आणि या कामासाठी त्यांच्याकडे कधीच निधी नसल्याचा दावा ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत केला. तसेच गायमुख ते कापुरबावडी पर्यंतचा रस्ता ताब्यात घेण्याची तयारी दाखवत या रस्त्याचे काम आम्ही करू असे राव यांनी यावेळी त्यांनी केला.
महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात जुंपल्याचेही चित्र दिसून आले. गायमुख घाटातील मिरा भाईंदर हद्दीत असलेले काम त्या महापालिकेने पूर्ण केले आहे. परंतु ठाणे महापालिका हद्दीतील काम अद्याप का मार्गी लागले नाही, असा सवाल सरनाईक यांनी या बैठकीत उपस्थित केला. त्यावर आमच्या कडून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचा दावा महापालिकेने केला. तर आमच्याकडूनही निविदा प्रक्रिया झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकायांनी दिली. परंतु कामाला अद्याप सुरवात न झाल्याने सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली.
यावर आम्हीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील खड्डे देखील बुजवत असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. परंतु त्यांच्या मालकीच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी देखील निधी नसल्याचा गंभीर आरोपही यावेळी राव यांनी केला. त्यामुळे कापुरबावडी ते गायमुख हा रस्ता ताब्यात घेण्याची तयारी दाखत आम्ही ते काम करु असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाच्या समन्वयाअभावी वाहनांची कोंडी
घोडबंदर मार्गावरुन मुंबई, वसई, पालघर, गुजरातला जातांना गायमुख घाट हा महत्वाचा मानला जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथील रस्ता खड्यात जात असल्याने वाहन चालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची वारंवार डागडुजी करण्यात आली. त्यासाठी कोट्यावधींचा निधी देखील खर्ची करण्यात आला आहे. यंदा देखील पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावर वेगळा प्रयोग करण्यात आला होता. परंतु त्यानंतरही हा रस्ता खड्यात गेला होता. आता दोन शासकीय यंत्रणांच्या वादात या रस्त्याचे काम रखडले आहे.