भाईंदर : राजू काळे
मुंबई व मिरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यावर लोकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने हा टोल नाका वरसावे येथील वाहतूक पुलाच्या पुढे स्थलांतरीत करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची 23 सप्टेंबर रोजी प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांना परवानगी देण्यासाठी साकडे घातले होते. त्याला गडकरी यांनी नकार दिला असून तसे पत्र त्यांनी सरनाईक यांना 11 नोव्हेंबर रोजी पाठविले आहे.
तत्पूर्वी एनएचएआयने देखील या टोल नाक्याच्या वरसावे येथील स्थलांतराला नकार दिला होता. यामुळे राज्य शासनाला प्रामुख्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या टोल नाका स्थलांतराच्या निर्णयाला दुसऱ्यांदा धक्का दिल्याचे दिसून आले आहे. यामुळे टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी जैसे थे राहण्याची शक्यता आहे.
दहिसर टोल नाक्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने हा टोल नाका रद्द करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मिरा-भाईंदर शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे येथील रस्त्यांवर वाहनांची रेलचेल वाढली असतानाच शहरातील नागरीकांना मुंबईला ये-जा करण्यासाठी दहिसर टोल नाका ओलांडावा लागतो. मात्र या दहिसर टोल नाक्यावरून मुंबईकडे जाताना किंवा मुंबई वरून येताना बहुतांशी वाहने येथील वाहतूक कोंडीत अडकून पडतात. यात मोठा वेळ वाया जात असून या वाहतूक कोंडीसह प्रदुषणामुळे परिसरातील पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.
या टोल नाक्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीतून सर्वसामान्य नागरीकांची मुक्तता व्हावी, यासाठी सरनाईक यांनी हा टोल नाका दहिसर टोल नाक्यापासून सुमारे 4 किलो मीटर अंतरावरील वसई-विरार महापालिका हद्दीत असलेल्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरसावे वाहतूक पुलापुढे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी दहिसर टोल नाक्याचे स्थलांतर दिवाळीपूर्वी करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच सरनाईक यांनी 23 सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्षात भेट घेत त्यांना टोल नाका स्थलांतरासाठी साकडे घातले.
यावर गडकरी यांनी दहिसर टोल नाका स्थलांतराला तत्वतः मंजुरी दिल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) च्या संबंधित अधिकारी तथा पदसिद्ध अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करीत दहिसर टोल नाका वरसावे वाहतूक पुलापुढे स्थलांतर करण्याची परवानगी मागितली. त्यावर दहिसर टोल नाका मुंबई महापालिका अधिकारक्षेत्रात येत असून जर तो वरसावे वाहतूक पुलापुढे स्थलांतर केल्यास तो वसई-विरार शहर महापालिकेच्या अधिकारक्षेत्रात येईल, असे सांगून एनएचएआयच्या मुंबई कार्यालयाने एक्स वर पोस्ट करीत टोल नाक्याच्या वरसावे येथील स्थलांतराला नकार दिला.
गडकरींचे सरनाईक यांना पत्र
यानंतर गडकरी यांनी 11 नोव्हेंबर रोजी सरनाईक यांना पत्र पाठवित त्यात दहिसर टोल नाक्याच्या वरसावे येथील स्थलांतरामुळे जवळच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल प्लाझातील अंतर अंदाजे 30 किमी पर्यंत कमी होईल. स्थलांतराची जागा वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत येत असून राष्ट्रीय महामार्गावरील गैर-राष्ट्रीय टोल प्लाझाचे स्थलांतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या राष्ट्रीय महामार्ग टोल शुल्क धोरणाच्या तरतुदींशी सुसंगत नाही. त्यामुळे दहिसर टोल प्लाझावरील गर्दी कमी करण्यासाठी एनएचएआयच्या मार्गाच्या अधिकारात स्थलांतर करण्याऐवजी पर्यायी उपाययोजना करण्याची सूचना सरनाईक यांना केली आहे.