Kalyan MSEDCL Power Issue Pudhari
ठाणे

Kalyan Power Outage | कल्याण पूर्वेत विजेच्या लपंडावाने ग्राहक संतप्त: आंदोलनाचा इशारा

विजयनगर, चिंचपाडा, काटेमानिवली, तिसगाव, कोळसेवाडी परिसरातील नागरिक महावितरणच्या कारभारावर नाराज

पुढारी वृत्तसेवा

Kalyan MSEDCL Power Issue

डोंबिवली: कल्याणच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार आणि दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे ग्राहकांचा संताप अनावर झाला आहे. अनेक भागांत दररोज पाच ते आठ तास वीजपुरवठा खंडित राहत असल्याने गृहिणी, व्यापारी, विद्यार्थी आणि लघुउद्योग मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

विजयनगर, चिंचपाडा, काटेमानिवली, तिसगाव, कोळसेवाडी आणि परिसरातील ग्राहकांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिवसभरात अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, लिफ्ट सेवा, इंटरनेट, ऑनलाईन कामकाज आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास विस्कळीत होत आहे. उष्णतेमुळे लहान मुले, ज्येष्ठ ग्राहक आणि रूग्णांचे विशेष हाल होत आहेत.

ग्राहकांचा संयम सुटण्याची चिन्हे

सततच्या वीजखंडितीमुळे दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि घरातून व्यवसाय करणाऱ्या ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे. फ्रीज, संगणक आणि इतर विद्युत उपकरणांच्या वापरावर परिणाम होत असून अनेकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प होत आहेत. ग्राहकांनी महावितरण अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही ठोस सुधारणा झालेली नसल्याने आता संयम सुटत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. समस्या तातडीने सोडवली नाही तर तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही ग्राहकांनी दिला आहे.

अखंडित वीजपुरवठा कधी?

महावितरणकडून या समस्येवर तांत्रिक कारणे आणि दुरूस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा कधी मिळणार ? याबत स्पष्ट कालमर्यादा देण्यात आलेली नसल्याने असंतोष कायम आहे. ही परिस्थिती तातडीने सुधारून कल्याण पूर्वेतील ग्राहकांना नियमित आणि अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्राहक आणि विविध संघटनांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT