पनवेल (ठाणे) : गटारी अमावस्येला अजून तीन दिवस उरलेले असतानाच रविवारचा खास बेत म्हणून पनवेलकरांनी ताज्या बोंबीलचा मनसोक्त आस्वाद घेत गटारीचा आनंद लुटला.म्हावरा खरेदीसाठी उरण नाक्यावरील कोळीवाड्यात ग्राहकांची मोठी गर्दी झालेली होती.वाढत्या मागणीने सर्वच माशांचे दरही वाढल्याचे दिसून आले.
गुरुवारपासून (दि.24) पासून श्रावणमासास प्रारंभ होणार आहे. श्रावणात मांसाहार न करणारे अनेकजण असतात.त्यामुळे ते सर्वजण श्रावण सुरु होईपर्यंत म्हावरा,चिकन,मटणावर मनसोक्त ताव मारताना दिसतात.याचा प्रत्यय रविवारी पनवेलमध्ये दिसून आला.उरण नाक्यावरील मच्छीमार्केटला जणू यात्रेचेच रुप आलेले होते.सकाळपासूनच ताजी मच्छी खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी झालेली होती.पावसाळा सुरू असल्याने मोठी मच्छी तशी कमी मिळते पण ताजे बोंबील हे या काळात मोठ्या प्रमाणात येत असतात.
आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि चविष्ट असलेल्या या बोंबीलाला खवय्यांकडून जादा मागणी असते.रविवारीही ताज्या बोंबील खरेदीसाठी मोठा प्रतिसाद लाभला.100 रुपयांच्या वाट्याला 8 ते 10 बोंबील या पद्धतीने खरेदी,विक्री होत राहिली.यामुळे ताज्या बोंबीलाला मागणी वाढल्याचे दिसून आले. ाता सर्वार्ंनाच वेध लागलेत ते बुधवारचे.या दिवशी मध्यरात्री आमावस्येला प्रारंभ होत आहे.ही दीप अमावस्या गुरुवारी दिवसभर आहे.यामुळे अनेकजण गुरुवारी मांसाहार करणे टाळून बुधवारीच गटारी साजरी करतील,असा अंदाज आहे.एकूणच बाहेर पावसानेही चांगली सुरुवात केलेली आहे. हवेत गारवाही निर्माण झाला आहे.त्यात रविवार सुट्टी असल्याने खवय्यांनी मस्तपैकी म्हावरा, चिकन, मटणावर मनसोक्त ताव मारत संडे स्पेशल साजरा केला.
मार्केटमध्ये चक्कर मारली असता रावस, पापलेट, सुरमई, घोळ, चिंबोर्या, मुठ्या आदी माशांची आवकही दिसून आली.रावसचा दर 500 ते 1000 रुपयांपर्यंत होता तर पापलेटही 500 रुपयाला पाच अशा पद्धतीने समोरचा ग्राहक बघून विकले जात होते.ताजा म्हावरा असल्याने ग्राहकही दरात फारशी घासाघीस न करता कोळीणीकडून येणार्या दरांत मासे घेताना दिसत होते.श्रावणात महिनाभर तरी मासे खाता येत नसल्याने अनेकांनी मोठ्या प्रमाणात रविवारी म्हावरा खरेदी करत रविवारीच गटारी अमावस्येचा आनंद लुटला. म्हावर्याप्रमाणेच चिकन 400 रुपये किलो,मटण 800 रुपये किलो असे दर रविवारी होते.