

ठाणे : शहरातील आणि उपनगरांतील बहुतांश मासळी बाजारांमध्ये रविवारी (दि.20) माशांच्या दरांनी अक्षरशः गगनाला भिडले. वाम मासा तब्बल 450 रुपये पाव, म्हणजेच एक किलोसाठी तब्बल 1,800 रुपये तर सुरमई मासा 350 रुपये पाव किलो, म्हणजेच 1 हजार 400 रुपये किलो दराने विकला जात होता.
शुक्रवारपासून (दि.25) श्रावण महिन्याला सुरुवात होत असून यापूर्वीचा रविवार मांसाहार करून साजरा करण्यासाठी खवय्यांनी मासळी बाजारात मोठी गर्दी केली होती. तर वाढलेल्या दराने खवय्यांच्या खिशाला मोठा फटका बसला. बोंबील, कोळंबी आणि पापलेट या लोकप्रिय माशांच्या दरातही गेल्या आठवड्याच्या तुलनेत 100 ते 150 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. या दरवाढीमुळे मासळीप्रेमी ग्राहकांचा हिरमोड झाला असून अनेकांनी पर्याय म्हणून मटण व चिकनकडे वळण्याचा निर्णय घेतला.
श्रावण महिना सुरू होण्या आधीचा शेवटचा रविवार असल्याने मासळी बाजारात मोठी गर्दी पहायला मिळाली. बदलापूर, अंबरनाथ आणि आसपासच्या शहरांमध्ये मासळी बाजार गर्दीने ओसंडून वाहत होते. मात्र यंदाच्या रविवारी ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसला.रविवारी जवळपास सर्वच मासळी बाजारामध्ये माशांचे दर गगनाला भिडलेले पाहायला मिळाले. माशांच्या दरवाढीमागे पावसाळ्यातील पुरवठ्याची मर्यादा आणि मासेमारीवरील निर्बंध कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. यापुढे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुख्य दर (प्रति किलो):
वाम मासा : 1,800
सुरमई : 1,400
बोंबील : 600 ते 800
पापलेट : 1,800 ते 2,000
कोळंबी : 700 ते 1,200
दरवाढीमुळे मासळीप्रेमींच्या खिशावर ताण आला असून, रविवारी अनेकांनी मासळीऐवजी मटण आणि चिकनकडे वळण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक आठवड्याला मासळी घ्यायची सवय असली, तरी आता दर पाहून मागे वळावे लागते, असे एका ग्राहकाने सांगितले.