अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात असताना आता शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या खासगी कार्यालयावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या प्रकरणामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे.
नवीन भेंडी पाडा परिसरात मध्यरात्री 12.15 च्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या खासगी कार्यालयावर चार राऊंड फायर केले. या गोळीबारात कार्यालयाचे काचेचे दार फुटले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोळीबार करणार्या अज्ञात दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांना गोळीबार करणार्यांचे नाव सांगूनही गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. नरेंद्र पवार, गुलाबराव करंजुळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले.
दोषींना सोडणार नाही ः शेलार
निवडणुकांमध्ये विचारांचे सोने लुटायचे असते. एकमेकांवर व्यक्तिगत किंवा शारीरिक हल्ले करणे अपेक्षित नाही, असे सांगतानाच आशिष शेलार यांनी यात जे कुणी दोषी असतील त्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. या प्रकाराची संपूर्ण माहिती पोलिस यंत्रणा घेत आहे. याची चौकशी होईल, असेही शेलार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमके काय घडले?
दुचाकीवरून दोन अज्ञात इसम आले आणि त्यांनी कार्यालयाच्या समोर उभे राहून अचानक कार्यालयाच्या दिशेने 3-4 राऊंड फायर केले. गोळीबाराचा आवाज ऐकून कार्यालयातील सुरक्षारक्षक बाहेर आले. हल्लेखोरांनी त्याच्या दिशेनेही गोळ्या झाडल्या.