

निपाणी : शॉर्टसर्किटमुळे माळरानातील गवताला लागलेली आग भडकल्याने दोन महागड्या कार जळून खाक झाल्या. या घटनेत सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी दुपारी निपाणीजवळील हायटेक कॉलनी (पार्क) परिसरात घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या भागात मोठ्या प्रमाणात गवतीरान असल्याने आग वेगाने पसरली. त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची नोंद येथील अग्निशमन दलाच्या कक्षात करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहराबाहेरील पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत हायटेक कॉलनी (पार्क) वसलेली आहे. हा परिसर विस्तीर्ण माळरान स्वरूपाचा असून येथे अनेक ठिकाणी प्लॉटिंग झाली आहे. अनेक प्लॉटधारकांनी आपल्या बंगल्यांचे बांधकाम सुरू केले आहे. दरम्यान, या भागातून गेलेल्या विद्युत खांबावरील तारा एकमेकांना स्पर्श झाल्याने ठिणगी पडली आणि ती गवतावर पडताच आग भडकली.
याच परिसरात माजी उपनगराध्यक्ष भूषण मोहिते यांच्या बंगल्याचे बांधकाम सुरू असून त्यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला व तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन दलाचे निरीक्षक एस. एन. नांगनुरे यांच्यासह कर्मचारी एस. आय. खिचडी, एस. पी. दळवाई, विश्वनाथ तळवार, जे. डी. कमते, महेश कांबळे व उदय पट्टण यांनी बंबासह घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने नियंत्रण मिळवणे कठीण ठरले.
या आगीत येथील श्रीराम मोटर्सचे मालक सिद्धु बुरुड यांनी आपल्या रिकाम्या प्लॉटमध्ये उभ्या केलेल्या दोन कार पूर्णपणे जळून खाक झाल्या. त्यामुळे त्यांचे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट हवेत पसरल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. परिणामी काही काळ तणावपूर्ण व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
माळरान परिसर असल्याने आग वेगाने पसरली
हायटेक कॉलनी (पार्क) हा संपूर्ण माळरानाचा परिसर असून येथे मोठ्या प्रमाणात गवतीरान वाढले आहे. उन्हाचा तीव्र कडाका आणि विद्युत तारांमधून पडलेली ठिणगी यामुळे आग क्षणात भडकली. परिसर विस्तीर्ण असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अग्निशमन दलासाठी कठीण ठरले.