डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील शहाड स्टेशन जवळ असलेल्या परिसरातील मयूर टेलर या दुकानात फटाक्यांमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीने रौद्ररूप धारण करण्याआधीच चार तरूणांनी धाडस दाखवत आगीवर नियंत्रण मिळविले.
मिळालेल्या माहितीनुसार, मयूर टेलर हे दुकानासमोर फटाके फोडले जात होते. त्यातील ठिणग्या दुकानात उडाल्याने आग लागली. काही क्षणांतच धूर व ज्वाळा उठू लागल्या. परिसरात एकच गोंधळ उडाला. बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मात्र, आग विझवण्यासाठी पुढे जाण्याचे कुणीही धाडस करत नव्हते. इतक्यात किरण मोरे आणि त्याच्या तिघा सहकाऱ्यांनी कोणतीही भीती न बाळगता धाव घेऊन आगीला रोखण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत या तरूणांनी ग्रीलवर चढून फायर एक्सटिंग्विशर आणि बादलीतील पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. या प्रयत्नात किरण मोरे किरकोळ जखमी झाला असला तरी त्याच्या आणि सहकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग शेजारी असलेल्या दुकानांपर्यंत पसरली नाही. अन्यथा होत्याचे नव्हते झाले असते. दरम्यान, अग्निशमन दलानेही घटनास्थळी तातडीने पोहोचून आग पूर्णपणे विझवली. या चार तरूणांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे परिसरातील रहिवासी आणि दुकानदारांसह अग्निशामक दलाकडून कौतुक करण्यात येत आहे.