मुंबई : मुंबईत आग दुर्घटनांचे सत्र सुरूच असून रविवारी आगीने सातवा बळी घेतला. सोमवारी कफ परेड येथील मच्छीमार नगरातील एक चाळ आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या दुर्घटनेत 15 वर्षीय यश विठ्ठल खोत यांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य तीन जखमींना तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी 1 ऑक्टोबर राजी कांदिवलीत गॅस गळतीच्या भडक्यातील जखमी सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे.
देवेंद्र चौधरी (वय 30) यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर विराज खोत (वय 13) आणि संग्राम कुर्णे (वय 25) या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. ऐन दिवाळी सणाच्या दिवशी घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
येथील कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, मच्छीमार नगर येथील एका चाळीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली. आगीची तीव्रता अधिक असल्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या तीन बॅटरी, वीजजोडणी आणि घरातील वस्तूंमध्ये वेगाने पसरली. सुमारे 10 बाय 10 फुटांच्या जागेत आगीचे हे तांडव सुरू होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस आणि बेस्टचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य हाती घेत आगीच्या विळख्यातून चार जणांना तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यांना उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 15 वर्षीय यश खोत या मुलाला डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक तपासानुसार इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमुळे आग भडकल्याचा तीव्र संशय व्यक्त केला जात आहे.
कांदिवलीत एका कॅटरिंगच्या दुकानात गॅस गळती होत आग लागून 24 सप्टेंबर रोजी सहा कामगार होरपळले होते. आठवडाभरात उपचारादरम्यान या सहाही कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आगीच्या घटनांचे सत्र सुरूच राहिले. सोमवारच्या कफ परेड येथील मच्छीमार नगरातील चाळीतील आगीत चार जखमी झाले असून यातील एकाचा मृत्यू झाला आहे.
13 ऑक्टोबर : घाटकोपर एलबीएस मार्गावरील गोल्डन क्रश बिझनेस पार्कला आग लागली.
14 ऑक्टोबर : मध्यरात्री कुर्ल्यातील कपाडियानगरमधील 20 ते 30 गोदामे जळून खाक झाली.
15 ऑक्टोबर : पहाटे गोरेगावमधील एका निवासी इमारतीत आग लागली. यात दोघे गुदमरले होते.
16 ऑक्टोबर : पहाटे क्रॉफर्ड मार्केटमधील एका दुकानाला आग लागली.
17 ऑक्टोबर : शुक्रवारी अंधेरी पूर्वकडील मिलिटरी रोड, अशोक टॉवरजवळील केडीएन कंपाउंडमधील एक गाळा आगीत भस्मसात झाला.
19 ऑक्टोबर : वरळीतील महाकाली नगर परिसरात रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सुमारे 12 ते 15 झोपड्या जळून खाक झाल्या.