टिटवाळा : टिटवाळा पूर्वेकडील गणेश मंदिर रोडवरील प्रथमेश हॉलमध्ये बुधवारी मध्यरात्रीनंतर अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मंगल कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर साठवून ठेवलेल्या इलेक्ट्रिक साहित्यामध्ये बिघाड होऊन शॉर्टसर्किट झाल्याने ही आग भडकली असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत हॉलमधील सजावटीसाठी वापरण्यात येणारे काही साहित्य जळून खाक झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रात्री साधारण दोनच्या सुमारास हॉलमधून धुराचे लोट आणि आगीची झळ जाणवताच स्थानिक नागरिक सतर्क झाले. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. सूचना मिळताच अग्निशमन दलाचे जवान काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शिताफीने पाणी मारत आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग इतर भागात पसरू न देता मोठा अनर्थ टळला.
आग दुसऱ्या मजल्यापुरती मर्यादित राहिल्याने मोठे आर्थिक नुकसान टळले असले तरी मंगल कार्यालयातील डेकोरेशनचे साहित्य आणि काही इलेक्ट्रिक उपकरणांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक तपासात वायरिंगमधील तांत्रिक बिघाड किंवा साठवून ठेवलेल्या इलेक्ट्रिक साहित्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर अग्निशमन दलाने संपूर्ण इमारतीची पाहणी करून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची खात्री केली.
विशेष म्हणजे, टिटवाळा परिसरात अलिकडच्या काळात आगीच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. अल्पावधीत घडलेली ही दुसरी आग लागण्याची घटना असल्याने सार्वजनिक व खासगी इमारतींमधील विद्युत यंत्रणांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मंगल कार्यालये, दुकाने आणि वस्तीच्या ठिकाणी वायरिंगची नियमित तपासणी, तसेच अग्निसुरक्षा साधनांची उपलब्धता याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दरम्यान, या आगीची अधिकृत नोंद संबंधित यंत्रणांकडून घेण्यात आली असून नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.