डोंबिवली: रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसायांवर वचक बसावा यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कल्याण-डोंबिवलीकडे मोर्चा वळविला आहे.
कल्याण पूर्वेकडे असलेल्या खडेगोळवलीतील एका पॉलीक्लिनिकवर २६ जुलै रोजी अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने अचानक छापा टाकला. या छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांनी लाखो रुपये किंमतीचा विनापरवाना औषधसाठा जप्त करून तो तपासणीकरिता शासनाच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविला आहे.
या संदर्भात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान या पॉलीक्लिनिकमध्ये मोठ्या प्रमाणावर ॲलोपॅथिक औषधे साठवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले.
मात्र या औषधांच्या खरेदी-विक्रीसाठी आवश्यक असणारा कायदेशीर परवाना संबंधितांकडे नसल्याचे स्पष्ट झाले. परवाना नसताना औषधोपचार करणे आणि औषधांचा साठा करणे हा औषध व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० चा भंग असल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई केली.
छाप्याच्या वेळी पॉलीक्लिनिकमध्ये आढळून आलेला १ लाख ३ हजार ६९० रुपये किमतीचा औषधसाठा पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला आणि तो जप्त करण्यात आला.
औषधांचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत
पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि तपासणीसाठी या साठ्यातील दोन वेगवेगळ्या औषधांचे नमुने घेऊन ते विश्लेषणासाठी शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्या अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. अनेक रुग्ण उपचारासाठी या पॉलीक्लिनिकमध्ये जात असत. संबंधित रुग्णांच्या आरोग्यास कोणता धोका निर्माण झाला आहे का? याचीही तपासणी केली जाणार आहे.
अन्य पॉलीक्लिनिकचीही होणार तपासणी...
परवाना नसताना औषधे विकणाऱ्या आणि रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा संस्थांवर कठोर कारवाईचा धडाका यापुढेही सुरूच राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवलीतील इतर पॉलीक्लिनिक आणि मेडिकलची देखील तपासणी केली जाणार आहे. आरोग्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्याच्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.