ठाणे : अलीकडे मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढताना दिसत असले तरी त्याहीपेक्षा अधिक धोकादायक बाब म्हणजे त्यांच्या यकृतामध्ये साठणारी चरबी. इस्रायलमधील संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की लहान वयातच यकृतात (लिव्हर) चरबी साठण्याचे प्रमाण वाढल्यास पुढे जाऊन टाइप-2 मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि लिव्हर सिरोसिससारखे आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
तेल अवीव विद्यापीठ आणि डाना ड्वेक चिल्ड्रन्स हॉस्पिटल यांनी केलेल्या संयुक्त अभ्यासात लठ्ठपणाने ग्रस्त 31 मुलांची तपासणी करण्यात आली. आजारांची लक्षणे असलेल्या मुलांच्या यकृतात सरासरी 14 टक्के चरबी आढळून आली, तर आरोग्यदृष्ट्या निरोगी असलेल्या मुलांमध्ये ती केवळ 6 टक्के होती. विशेष म्हणजे, दोन्ही गटांतील मुलांमध्ये आंतरिक चरबी (विसरल फॅट) किंवा वजन यामध्ये फारसा फरक नव्हता; मात्र यकृतातील चरबीचे प्रमाण वेगळे होते. ही तपासणी एमआरआय स्कॅनसारख्या वेदनारहित पद्धतीने करण्यात आली.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’ ही सध्या मुलांमध्ये वाढणारी गंभीर समस्या ठरत आहे. ही स्थिती सुरुवातीस लक्षणांविना असली, तरी हळूहळू ती शरीरातील इतर अवयवांवर परिणाम करू लागते. तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या आहारात फळं, भाज्या, संपूर्ण धान्ये, कडधान्ये, मासे, ऑलिव्ह तेल आणि सुका मेवा यांचा समावेश केल्यास यकृताचे आरोग्य टिकवता येऊ शकते. मुलांचे वजन योग्य पातळीवर ठेवण्याबरोबरच त्यांचा आहार पोषणमूल्यांनी भरलेला असावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आजच्या युगात लहान वयात दिसणारी यकृतातील चरबी ही भविष्यातील गंभीर आरोग्य संकटांचे दार उघडत आहे. याकडे दुर्लक्ष न करता आहार आणि जीवनशैलीमध्ये वेळेत बदल केल्यास ही स्थिती टाळता येऊ शकते.
शहरी भागांतील मुलांना धोका अधिक
अलिकडच्या काळात शहरी भागांतील लहान मुलांमध्ये जंक फूडचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर शारीरिक हालचालींचा अभावही यामागे कारणीभूत ठरतो. यामुळे भविष्यात या मुलांना कमी वयातच जीवनशैलीजन्य आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुलांच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. टिफिनमध्ये बिस्किट्स, वेफर्सऐवजी फळं, डाळींचे पराठे, हे पर्याय अधिक उपयुक्त ठरू शकतात. आरोग्य तपासणी करून यकृताचे आरोग्य कसे आहे, लक्ष ठेवणे गरजेचे आहे.