Crime News pudhari photo
ठाणे

Dombivli Crime | डोंबिवलीत हप्ता वसुलीवरून हॉटेल व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला; दोन बरगड्या तुटल्या

मानपाडा पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

Extortion Attack Dombivli

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या डोंबिवली जवळच्या गोळवली परिसरात हप्ता वसुलीच्या वादातून हॉटेल व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पंकज दुबे (३८) यांच्या दोन बरगड्या तुटल्या असून मानपाडा पोलिसांनी मुख्य आरोपी अजित शरद सिंह याच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

यातील हॉटेल व्यवसायिक असलेले तक्रारदार पंकज दुबे हे कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या टाटा पॉवर हाऊस येथील देशमुख होम्स सोसायटीत राहतात. शनिवारी रात्रीच्या सुमारास ते पांडुरंगवाडीतल्या समतानगर येथे रिक्षातून उतरून पायी घरी जात होते. इतक्यात अजित सिंह आपल्या तीन-चार साथीदारांसह तेथे आला. पंकज दुबे यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ करत त्यांना जबरदस्तीने ओढत इमारतीच्या मागे नेले.

 या संदर्भात पंकज दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित सिंह याने कमरेला खोचलेले पिस्तूल काढून रोखले. तुझ्या भावाने वेळेवर हप्ता दिला नाही असे म्हणत धमकावले. त्यानंतर चाकूच्या मागील बाजूने आणि फायटरने पंकज यांच्या छातीवर आणि डाव्या बरगड्यांवर चार ते पाच वेळा जोरदार वार केले. एवढ्यावरच न थांबता हल्लेखोरांनी त्यांना जमिनीवर पाडून छातीवर बसून गळा दाबला, त्यामुळे ते बेशुद्ध पडले.

हे पाहून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. सुमारे २० मिनिटांनी शुद्धीवर आल्यानंतर पंकज यांनी थेट मानपाडा पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना तातडीने शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून फरार हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT