ठाणे

Thane News | नालासोपार्‍यात घरगुती पाईप गॅसचा स्फोट

पुढारी वृत्तसेवा

नालासोपारा : नालासोपार्‍यात पाईप गॅस जोडणी करण्याचे काम सुरू असताना स्फोट झाला आहे. शनिवारी (दि.२०) रोजी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास ही घटना घडली. यात दुर्घटनेत 4 जण होरपळले असून त्यात 3 कामगार आणि एका रहिवाशाचा समावेश आहे.

गॅस जोडण्या देत असताना कामादरम्यान होत असलेल्या निष्काळजीपणामुळे परिसरात वारंवार अशा घटना घडत आहेत. तसेच मनुष्यबळाअभावी योग्य अनुभव व प्रशिक्षण न देताच कर्मचारी कामासाठी ठेवले जात असल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

नालासोपारा पूर्वेच्या गाला शिर्डीनगर येथील चंद्रेश हिल्स सी 10 या इमारतीत गुजरात गॅस कंपनीचे गॅस जोडणीचे काम सुरू होते. शनिवारी (दि.२०) रोजी सायंकाळी गुजरात गॅस कंपनीचे तीन मजूर त्याठिकाणी गॅस जोडणीचे काम करीत होते. मात्र गॅस पुरवठा होत असलेल्या वाहिनीची वॉल बंद न करता काम केल्याने अचानक स्फोट झाला. यात तीन कामगार आणि एक रहिवासी होरपळले आहेत. या अपघातात संजय निकम व कर्मचारी अंगद कुमार, विशाल कुमार आणि सतीश कुमार अशी जखमींची नावे असून त्यांना उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहचून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू केले आहे. चंद्रेशहिल्स सी 10 या इमारतीमध्ये मीटर बसवण्याचा काम सुरू होतं यावेळी याच इमारतीत अन्य तीन जणांच्या घरांमध्ये याच कर्मचार्‍यांनी मीटर बसवले होते चौथा मीटर घर मालक सुरेश लिगम यांच्या घरामध्ये बसवत असताना गॅस पाईपलाईन बंद न करता ड्रिल केल्यामुळे गॅसच्या संपर्कात ड्रिल मशीन स्पार्क होऊन स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

SCROLL FOR NEXT