Dombivli Illegal Shop Lock Breaking
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या फडके रोडवरील पाटकर प्लाझासमोरच्या चिमणी गल्लीतील कृष्णा ग्लोरी इमारतीमध्ये गाळ्याच्या वादातून जबरदस्तीने कुलूप तोडून बेकायदेशीरपणे प्रवेश करून दमबाजी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना १६ ऑक्टोबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे.
या संदर्भात वासुदेव कृष्णा घरात (५२) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी वासुदेव घरत हे बांधकाम व्यावसायिक असून ते नवी मुंबईतील खारघर येथे राहणारे आहेत. दाखल फिर्यादीनुसार आरोपी दिलीप वामन म्हात्रे, प्रमिला दिलीप म्हात्रे आणि अजिंक्य दिलीप म्हात्रे (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) या तिघांनी आपसात संगनमत करून वासुदेव घरत यांच्या मालकीच्या कृष्णा ग्लोरी इमारतीतील गाळा नंबर ६ ला लावलेले कुलूप तोडून सदर गाळ्यामध्ये विनापरवाना आणि बेकायदेशीररित्या प्रवेश करून घुसखोरी केली.
याबाबत विचारणा केली असता आरोपी दिलीप म्हात्रे यांनी तुझा माज अजून कमी झाला नाही का अशी धमकी दिली. तर आरोपी प्रमिला म्हात्रे यांनी खोटा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली. बोलाचाली सुरू असताना आरोपी अजिंक्य म्हात्रे याने अंगावर धावून येऊन शिवीगाळ केली. तर दिलीप म्हात्रे यांनी धक्काबुक्की करून आपल्या मालकीच्या गाळ्यातून हाकलून दिल्याचे वासुदेव घरत यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी वासुदेव घरत यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३२, ३५१ (२), ६५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रकाश जगताप अधिक तपास करत आहेत.