राष्ट्रकूट राजधानी एलिचपूर pudhari photo
ठाणे

Rashtrakuta capital Elichpur : राष्ट्रकूट राजधानी एलिचपूर

इ.स. 1294 नंतर दिल्ली सल्तनतचे मांडलिक असूनही, हे शहर इ.स. 1318 पर्यंत हिंदू प्रशासनाखाली राहिले, त्यानंतर ते थेट दिल्ली सल्तनतच्या अधिपत्याखाली आले.

पुढारी वृत्तसेवा

नीती मेहेंदळे

पूर्वीचा बेरार प्रांत, आताचा विदर्भात समावेश झालेला अमरावती जिल्हा अनेक देखण्या गावांचा इतिहास बाळगून आहे. महाराष्ट्राच्या या प्रदेशात वसलेले अचलपूर हे भारताच्या मध्ययुगीन भूतकाळाचे एक उल्लेखनीय प्रतीक आहे. पूर्वी एलिचपूर आणि इलिचपूर म्हणून ओळखले जाणारे हे प्राचीन शहर, आपल्या सीमांमध्ये शतकांचा भार व दख्खनच्या राजकीय भूभागाला आकार देणाऱ्या असंख्य राजवंशांच्या कथा सामावून आहेत. या कथांपैकी सर्वात महत्त्वाची कथा प्रसिद्ध मुघल सेनापती राजा मानसिंगच्या मृत्यूशी संबंधित आहे आणि त्याच्या जीवनाचा शेवटचा अध्याय याच ऐतिहासिक भागात घडला.

एलिचपूर या शहराचे ऐतिहासिक महत्त्व 8 व्या शतकापासून ओळखले गेले आहे, जेव्हा ते राष्ट्रकूट राजवंशाच्या एका शाखेची सुरुवातीची राजधानी म्हणून कार्यरत होते. पुरातत्वीय पुराव्यांवरून असे सूचित होते की, नवव्या शतकात अचलपूर येथे राष्ट्रकूट आणि कलचुरी यांच्यात एक महत्त्वपूर्ण लढाई झाली होती, ज्यामुळे मध्ययुगीन भारतात त्याचे लष्करी महत्त्व स्थापित झाले.

चालुक्य आणि राष्ट्रकुटांच्या काळात एलिचपूर हे महत्त्वाचे नगर होते असे या भागात सापडलेल्या ताम्रपटांवरून लक्षात येते. या शहराचा सर्वात जुना विश्वसनीय ऐतिहासिक संदर्भ 13 व्या शतकातील आहे, जेव्हा त्याची दख्खनच्या पठारावरील प्रमुख शहरांपैकी एक म्हणून ओळख होती. इ.स. 1294 नंतर दिल्ली सल्तनतचे मांडलिक असूनही, हे शहर इ.स. 1318 पर्यंत हिंदू प्रशासनाखाली राहिले, त्यानंतर ते थेट दिल्ली सल्तनतच्या अधिपत्याखाली आले.

आज अचलपुरात विलायतपुरा, हिरापुरा, दिलदारपुरा, सर्मसपुरा, सुल्तानपुरा, मुकेरिपुरा, बुंदेलपुरा, सवाईपुरा, जोगीपुरा, नसीबपुरा, महिराबपुरा, रायपुरा, बोरियापुरा असे अनेक प्रभाग आहेत. प्रत्येक भागात काही ना काही ऐतिहासिक इमारती पाहावयास मिळतात. या गावातील ऐतिहासिक अवशेष सध्या गावाच्या दाट वस्तीत विखुरलेले आहेत. अचलपूरचा किल्ला, गावाबाहेरची सुलतान गढी, भुलभुलैय्या दत्तमंदिर, राजा मानसिंह समाधी, मंडलेश्वर बारव, आणि हौद कटोरा ही ठिकाण महत्त्वाची.

इ.स. 1347 मध्ये अचलपूर आणि वऱ्हाड प्रदेशावर बहमनी सल्तनतचे राज्य होते. इ.स. 1490 मध्ये इमाद-उल-मुल्कने स्वतःला स्वतंत्र घोषित केले आणि वऱ्हाड सल्तनतच्या इमाद शाही राजवंशाची स्थापना केली. त्याने माहूर आपल्या नवीन राज्याला जोडले आणि एलिचपूर येथे आपली राजधानी स्थापन केली. त्यानंतर मुघल साम्राज्याच्या ताब्यात येईपर्यंत ते काही काळासाठी वऱ्हाड सुभ्याची राजधानी होते, त्यानंतर प्रांतीय राज्यपालांचे आसन बाळापूर येथे हलवण्यात आले.

अचलपूरपासून तीन किलोमीटर अंतरावरील होज कटोरा ही वैशिष्टयपूर्ण षट्कोनी इमारत अहमद शहावली बहामनी याने बांधली. अचलपूरमधील एक स्थापत्यशास्त्रीय आश्चर्य असलेला हौझ कटोरा, हा वाटीच्या आकाराचा एक ऐतिहासिक जलसाठा आहे, जो या शहराच्या प्रगत अभियांत्रिकी क्षमतेचे दर्शन घडवतो. पावसाचे पाणी साठवण्यासाठी बांधलेली ही ऐतिहासिक वास्तू केवळ व्यावहारिक उद्देशच पूर्ण करत नव्हती, तर प्राचीन काळातील शाश्वत शहरी नियोजनावरही प्रकाश टाकत होती.

या जलाशयाची वाटीसारखी रचना व मोक्याची जागा, त्याच्या सुवर्णकाळात शहराच्या लोकसंख्येला पाणी सुरक्षा प्रदान करण्यामधील त्याचे महत्त्व अधोरेखित करते. आज, वाढलेल्या वनस्पतींनी या वास्तूच्या काही भागांना वेढलेले असतानाही, हौझ कटोरा अचलपूरच्या समृद्ध स्थापत्य वारशाचा आणि प्राचीन भारतातील गुंतागुंतीच्या जल व्यवस्थापन प्रणालींचा साक्षीदार म्हणून उभा आहे.

राजा मानसिंगची छोटीशी समाधी मुकेरिपुरा आणि सुल्तानपुरा या दोन वस्त्यांच्या मधोमध पण वस्तीबाहेर आहे. त्याजवळच एक ऐतिहासिक बारवही आहे. तिची स्थिती फारशी चांगली नसली तरी त्यावरचे कोरीव काम आणि स्थापत्य हा वारसा असल्याची जाणीव करून देणारे आहे. इमादशाहीच्या अस्तानंतर अचलपूर निजामशाहीकडे आणि त्यानंतर मुघलांच्या ताब्यात गेले. या सत्ताकाळात खापरी नळ बांधून शहरभर पाणी पुरवण्याची व्यवस्था केली होती. बिच्छन नदीवर त्यासाठी एक धरणही बांधण्यात आले होते, असा उल्लेख गॅझेटियरमध्ये आहे. आता हे नळ बंद असले तरी त्याचे अवशेष व जागोजागी टाक्या अजूनही कायम आहेत. त्याला सातभुळकी म्हणतात.

अचलपूर गावात असलेल्या दाट लोकवस्तीत भुईकोट किल्ला आहे. गावातच त्याचे दरवाजे आहेत. या दरवाजातून सध्या रस्ते काढलेले आहेत. यात तीन दरवाजे पाहाता येतात. हिरापूर दरवाजा, बुंदेलपुरा दरवाजा, जीवनपुरा दरवाजा, दुल्हा दरवाजा हे दगडात बांधलेले दरवाजे आणि त्यांच्या बाजूला भव्य बुरुज शिल्लक आहेत. दरवाज्यांच्या दोन्ही बाजूला नक्षीकाम असलेल्या सुंदर चौकटी कोरल्या आहेत. दरवाजा व बुरुजांवर विटांनी बांधलेल्या चऱ्या आहेत. दरवाजावर ़फारसी भाषेत शिलालेख कोरलेले आहेत. शिवाय सोनगाव दरवाजा, खिडकी दरवाजा पाहता येतो. किल्ल्याची तटबंदी अनेक ठिकाणी शाबूत असून दुल्हा गेटच्या पुढे सलग तटबंदी पाहायला मिळते.

अचलपूर व परतवाडा ही सातपुड्याच्या कुशीत वसलेली जुळी शहरे आहेत. ही गावं चंद्रभागा नदीच्या उपनद्या असलेल्या सपन आणि बिच्छन नद्यांनी वेढलेली आहेत. पूर्वी पल्टनवाडा म्हणून ओळखले जाणारे व अचलपूर कॅम्प नावानेही ओळखले जाणारे परतवाडा हे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचं गाव. परतवाडा हे मेळघाट प्रदेशाचे प्रवेशद्वार आहे, जिथे भारतातील सर्वात मोठ्या वाघ संवर्धन प्रकल्पांपैकी एक प्रकल्प आहे.

अचलपूरच्या पृष्ठभागाखाली रहस्य व गूढतेने भरलेल्या ऐतिहासिक बोगद्यांचे जाळे पसरलेले आहे. शतकानुशतके जुन्या असलेल्या या भूमिगत मार्गांनी विविध कार्ये केल्याचे मानले जाते. राजघराण्यांसाठी गुप्त मार्गांपासून ते युद्धकाळात धोरणात्मक लपण्याच्या ठिकाणांपर्यंत. या रहस्यमय खोलगट भागांचा शोध घेणे हा अचलपूरच्या गुप्त इतिहासात आणि स्थापत्यशास्त्रीय कौशल्यामध्ये एक अविस्मरणीय प्रवास घडवतो.

अचलपूरची स्थापत्यशास्त्रीय विविधता केवळ किल्ल्यांंपुरती मर्यादित नसून, मंदिरे, मशिदी आणि नागरी प्रणालींपर्यंत पसरलेली आहे, ज्यात हिंदू, इस्लामिक आणि स्थानिक स्थापत्यशैलींचे सुसंवादी मिश्रण दिसून येते. प्रत्येक वास्तू सांस्कृतिक सहअस्तित्व आणि कल्पक प्रतिभेची गाथा सांगते, ज्यामुळे शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीला समृद्धी मिळते आणि तेथील आध्यात्मिक व नागरी जीवनशैलीची झलक मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT