भिवंडी : गुजरात येथील खवडा सौरऊर्जा प्रकल्पातून उत्पादित वीज पडघा वीज उपकेंद्रात वाहून आणण्या साठी खावड़ा 4 सी ट्रांसमिशन कंपनीकडून टाकण्यात येत असलेल्या विद्युत वाहिनी सह टॉवर उभारणीमुळे बाधित होणार्या शेतकर्यांच्या शेतजमिनीस नुकसान भरपाई देण्याच्या मोबदल्यात मोठी वाढ करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेतला असून याबाबत लवकरच अधिसूचना काढली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
गुजरात राज्यातील खवडा ते महाराष्ट्रातील पडघा दरम्मान उच्चदाब वीजवाहिनी उभारण्याचे काम वीज वहन क्षेत्रातील सुप्रसिद्ध कंपनी खावड़ा 4 सी ट्रांसमिशन कंपनीकडून केले जात आहे.त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील जव्हार विक्रमगड-वाडा तर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील अनेक गावातून ही वीजवाहिनी जात असल्याने त्यासाठी अनेक टॉवर उभारले जाणार आहेत. यामध्ये शेतकर्यांनी मिळत असलेल्या मोबदल्या बद्दल नाराजी असल्याने पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णु सावरा, विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र सखाराम भोये, भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे यांनी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न करीत चर्चा घडवून आणण्यात शेतकर्यांना वाढीव भरघोस दरवाढ मिळवून देण्यात यश मिळविले आहे.
शासकीय पातळीवर झालेल्या बैठकीत खावड़ा 4 सी ट्रांसमिशन कंपनीने वाढीव मोबदला देण्यास पाठिंबा देत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व वनखात्याच्या अधिकार्यांसोबत झालेल्या चर्चेतून शेतकर्यांना अपेक्षेप्रमाणे सुधारित दर निश्चित करण्यात यश मिळवले आहे. आता शेतकर्यांना स्थानिक प्रशासनाने निश्चित केलेल्या सुधारित दरांनुसार नुकसान भरपाई देणार आहे. हे दर आधीच्या तुलनेत तब्बल 15 ते 20 पट जास्त असल्याने दरवाढी मुळे शेतकर्यांना भरघोस नुकसान भरपाई मिळणार असल्याने शेतकर्यांचा विरोध मावळला आहे.
जमिनीचा मालकीहक्क शेतकर्यांकडेच
विशेष म्हणजे या नुकसानभरपाईनंतरही जमिनीचा मालकीहक्क शेतकर्यांकडेच राहणार असून आणि टॉवर उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकरी पुन्हा त्याठिकाणी शेती करू शकतील. याशिवाय टॉवर उभारणी दरम्यान पिकांची जी नुकसानभरपाई आहे, ती स्वतंत्रपणे दिली जाणार आहे. ज्या शेत जमिनीवरून वीजवाहिन्या जातील त्या शेतकर्यांनाही नुकसानभरपाई दिली जाणार आहे. त्यांच्या शेतीच्या कामावर किंवा इतर उपजीविकेवर त्याचा परिणाम होणार नाही, हे विशेष.