Crime Against Elderly Women
डोंबिवली : डोंबिवलीत सोमवारी सकाळी रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेगळ्या घटनांमध्ये दोघा ज्येष्ठ महिलांना लुटारूंनी लक्ष्य केले. या दोघींकडील जवळपास दीड लाखांहून अधिक किंमतीचा सोन्याचा ऐवज खेचून लुटारूंनी दुचाकीवरून पळ काढला. एकाच दिवशी एकाच भागात या दोन्ही घटना घडल्याने लुटारू एकच असावेत, असा पोलिसांचा कयास आहे.
या संदर्भात रामनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार ठाकुर्ली पूर्वेकडील खंबाळपाडा ९० फुटी रस्ता परिसरात त्रिलोक हाईट्समध्ये राहणाऱ्या सुलभा सोपान चौधरी (६२) या सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास लता महाजन आणि शुभांगी भंगाळे या मैत्रिणींसमवेत ९० फुटी रस्त्यावरील म्हसोबा चौकातून बंदिश पॅलेस चौकाच्या दिशेने जात होत्या. दावत हॉटेल जवळ जाताच समोरून भरधाव वेगात दुचाकी आली. दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसलेल्याने सुलभा चौधरी यांच्या मानेवर जोराने थाप मारून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकाराने या तिन्ही महिला घाबरल्या. सुलभा आणि त्यांच्या मैत्रिणींनी चोर चोर म्हणून आरडाओरडा केला, तथापी तोपर्यंत ३५ ते ४० वयोगटातील दोघेही लुटारू नजरेआड झाले होते.
दुसऱ्या एका घटनेत, सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पूर्वेकडील शिवमंदिर रोडला असलेल्या रघुराम सोसायटीत राहणाऱ्या हर्षला हरिश्चंद्र सोनवटकर (६३) या बँकेतील काम आटोपून टाटा लाईनखालील स्वामींचे घर येथे स्वामी समर्थ मठातून दर्शन घेऊन पायी घरी चालल्या होत्या. इतक्यात ३५ वयोगटातील दोघा बदमाशांनी आडवून हर्षला सोनवटकर यांना त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ आणि हातामधील अंगठी काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले. हर्षला यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखी करून त्यांच्या पिशवीतील एक लाख रूपये किंमतीचा सोन्याचा ऐवज काढून दोघा बदमाशांनी पळ काढला. हर्षला यांनी या संदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक शहाजी नरळे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ९० फुटी रोड परिसरात बंद झालेल्या चोऱ्या/वाटमाऱ्या पुन्हा वाढू लागल्याने पोलिसांनी या भागातील गस्त वाढविण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. सकाळच्या सुमारास अनेक रहिवासी ९० फुटी रोड परिसरात फिरण्यासाठी जात असतात. त्यातील ज्येष्ठ पादचाऱ्यांना चोर/लुटारू लक्ष्य करत असल्यामुळे पोलिसांनी या भागात सातत्याने गस्ती घालाव्यात, अशी मागणी महिलांकडून करण्यात येत आहे.