सापाड : चैत्र महिन्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पारंपरिक पालखी यात्रा आणि देवी-देवतांच्या जत्रांना मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. त्यातच लोणावळा परिसरातील कार्ला येथील प्रसिद्ध एकविरा देवी मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड, मुंबईसह कोकण पट्ट्यातील कोळी-आगरी समाजासाठी ही यात्रा विशेष श्रद्धेची मानली जाते. मात्र, वाढत्या गर्दीबरोबरच सुरक्षेच्या दृष्टीने उद्भवणाऱ्या समस्यांमुळे यंदाची यात्रा काहीशी चिंतेची ठरत असल्याची खंत कोळी महासंघाचे नेते देवानंद भोईर यांनी व्यक्त केली आहे.
विशेषतः एकविरा देवी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भोईर यांनी सांगितले की, ‘मंदिर परिसरात आणि यात्रेच्या मार्गांवर आधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारली गेली, तर चोरीच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात आळा बसू शकतो. तसेच गुन्हेगारांचा शोध घेणे सुलभ होईल.’ यासोबतच पोलिसांची गस्त वाढवणे, महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र पथके तैनात करणे, गर्दी व्यवस्थापनासाठी स्वयंसेवकांची मदत घेणे, अशा उपाययोजनांचीही मागणी करण्यात आली आहे.
आई एकवीरा देवीच्या जत्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोळी महासंघाचे नेते देवानंद भोईर यांनी पत्रकार परिषद घेत भाविकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. यात्रेदरम्यान सोन्याचे दागिने परिधान करणे टाळावे, स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे आणि प्रशासनाने तातडीने सुरक्षा उपाययोजना वाढवाव्यात, अशी भूमिका घेतली आहे. कार्ला येथील एकविरा देवी ही कोळी-आगरी समाजाची कुलदेवता मानली जाते. चैत्र महिन्यात येथे होणाऱ्या यात्रेला विशेष महत्त्व असून, हजारो भाविक पायी पालखी काढत, भजन-कीर्तन करत देवीच्या दर्शनासाठी येतात. अनेक गावांमधून निघणाऱ्या पालख्या आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात वातावरण भक्तिमय बनते. भैरव देवाच्या यात्रेपासून सुरू होणारी ही धार्मिक परंपरा कोळी-आगरी समाजात अत्यंत भावनिक स्वरूपाची आहे. समुद्रात मासेमारी करणारे अनेक बांधव वर्षभर कठोर परिश्रम करून या यात्रेत सहभागी होतात. त्यामुळे ही यात्रा केवळ धार्मिक नसून, सामाजिक एकात्मतेचेही प्रतीक मानली जाते. अलीकडील काही वर्षांत एकविरा देवी मंदिर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे.
यात्रा ही आपल्या श्रद्धेचा भाग आहे, पण त्याचबरोबर आपल्या कष्टाने कमावलेल्या संपत्तीचे रक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी सोन्याचे दागिने घालणे टाळावे आणि सतर्क राहावे. यात्रेतील आनंद हा दागिन्यांनी नाही तर श्रद्धेने लुटायचा.देवानंद भोईर, नेते, कोळी महासंघ
कोळी महासंघाने भाविकांसाठी यात्रेदरम्यान शक्यतो सोन्याचे दागिने परिधान करू नयेत, गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहावे, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात, कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी अशा सूचना दिल्या आहेत. एकविरा देवीची यात्रा ही कोळी-आगरी समाजासाठी केवळ धार्मिक सोहळा नसून, त्यांच्या ओळखीचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, बदलत्या काळात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या उपाययोजना करणेही तितकेच गरजेचे बनले आहे. कोळी महासंघाच्या आवाहनामुळे यंदाच्या यात्रेत भाविक अधिक सजग राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनानेही या मागण्यांची दखल घेत योग्य ती पावले उचलल्यास यात्रा अधिक सुरक्षित आणि सुरळीत पार पडेल, असा विश्वास महासंघाने व्यक्त होत आहे.